गेल्या वर्षी ‘नीरजा’ या चित्रपटाने जगभरात 125 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. या चित्रपटावर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुकांचा वर्षाव झाला होता. 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट तसेच इतर पुरस्कारांवरही या सिनेमाने आपले नाव कोरले होते. मात्र आता चित्रपटाच्या नफ्यावरून कुटुंबीय आणि निर्माते एकमेकांसमोर आले आहेत. ‘चित्रपटाच्या नफ्याचा १० टक्के भाग देण्याचे वचन निर्मात्यांनी दिले होते. पण आता ते देण्यास निर्मात्यांनी नकार दिला आहे,’ असा आरोप नीरजाच्या कुटुंबियांनी केला आहे.

पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात कुटुंबियांनी याविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत असं म्हटलंय की, ‘ब्लिंग अनप्लग्ड आणि फॉक्स स्टार स्टुडिओज इंडिया प्रायवेट लिमिटेड यांनी गुन्हेगारी कट रचला असून नीरजाच्या कुटुंबियांमध्ये आणि निर्मात्यांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा चुकीचा फायदा घेतला आहे.’ याआधी नीरजाच्या कुटुंबियांनी निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती. या याचिकेवर जुलैमध्ये सुनावणी होणार आहे.

PHOTO : असा असेल ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा लूक?

‘2 डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या करारात निर्मात्यांनी 7.5 लाख रुपये आणि चित्रपटाच्या नफ्याच्या 10 टक्के भाग देणार असल्याचे स्पष्ट केले होते,’ असं नीरजाच्या आईने स्पष्ट केलं. राम माधवानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल कसबेकर या चित्रपटाचा सह-निर्माता आहे. आई आणि भाऊ अखिल भनोटसोबत चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी करणारा नीरजाचा भाऊ अनीश भनोट यावेळी म्हणाला की, ‘चित्रपटाच्या नफ्याचा एक छोटासा भाग जेव्हा आम्हाला देण्याची वेळ आली तेव्हा निर्मात्यांनी तो देण्यास नकार दिला.’ तर दुसऱ्या बाजूस सह-निर्माता अतुल कसबेकर यांचे म्हणणे आहे की, ‘करारानुसार नीरजा सिनेमाला जेवढा नफा झाला आहे, तेवढे पैसे नीरजाच्या कुटुंबियांना आधीच दिले गेले होते, पण त्यांनी हे पैसे घेतले नाहीत.’