ग्रॅमी पुरस्कार विजेता कॉर्नेल हेन्स ऊर्फ नेली या अमेरिकन संगीतकाराला एका महिलेचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी वॉशिंग्टन पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो तुरुंगात असून त्याच्या वकिलांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायाधीशांनी धुडकावून लावत त्याच्या विरोधात अधिक पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. नेली एका संगीत कार्यक्रमाच्या निमित्ताने वॉशिंग्टन येथे आला होता. शनिवारी रात्री गाण्याचा सराव संपवून तो फेरफटका मारण्याच्या उद्देशाने शहराबाहेर पडला. त्याच दरम्यान त्याच्या हातून हा गुन्हा घडला, असा दावा पोलिसांनी केला आहे.पोलीस प्रवक्ते स्टीव्ह स्टॉकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे ४.३०च्या दरम्यान एक महिला अस्ताव्यस्त अवतारात पोलीस स्थानकात दाखल झाली. मानसिकदृष्टय़ा प्रचंड हादरलेल्या त्या स्त्रीने घडलेला सर्व प्रकार सांगून नेली विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सकाळीच नेलीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. दरम्यान, त्याने आपली राजकीय ओळख दाखवून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या पोकळ धमक्यांना भीक न घालता त्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस स्थानकात आणले गेले. लगेचच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात त्याने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे दिसून आले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या विरोधात अधिकाधिक पुरावे गोळा केले जात आहेत.