संगीत नाटक चालणे आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच नव्या युवा गायक अभिनेत्यांना संधी मिळणे आणि टिकून राहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. नव्या गायक अभिनेत्यांना घेऊन संगीत नाटक केले तर त्याला सगळेच नवे कलावंत असल्याने अपेक्षित किंवा भरघोस प्रेक्षक प्रतिसाद मिळू शकणार नाही. मग त्यासाठी मातबर आणि ज्या कलाकारांच्या नावावर प्रेक्षक नाटकाला येऊ शकतात, अशा दोन ते तीन कलाकारांबरोबर या नव्या गायक अभिनेत्यांना संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. संधी मिळाली की येणाऱ्या प्रेक्षकांसमोर त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येऊ शकते. ज्येष्ठ कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे नव्या गायक अभिनेत्यांना खूप काही शिकायला आणि अनुभव मिळू शकतो. एक कलावंत म्हणून मला संगीत नाटक करायचेच होते. संगीत रंगभूमीवरील मानाचे पान समजल्या जाणाऱ्या ‘संगीत संशयकल्लोळ’ची शताब्दी हा एक चांगला योग होता. म्हणून आम्ही हे नाटक सध्या करतो आहोत. माझ्यासह नाटकात राहुल देशपांडे असून इतरही काही नवे कलावंत (गायक अभिनेत्री) नाटकात आहेत. मातबर नाटय़संस्थांनीही जुन्या संगीत नाटकांची निर्मिती केली पाहिजे. आमच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ला तरुण पिढीचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नाटक पाहण्यासाठी आई-वडील लहान मुलांना घेऊन येतात, ही खूप आनंद व समाधान देणारी गोष्ट आहे.
 प्रशांत दामले