काळा कोट, वकिली रुबाब, कोर्ट, खटला आणि या सर्वाला बनारसची पार्श्वभूमी असलेल्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जवळ आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही प्रमोशनल व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता अक्षय कुमारही शक्य त्या सर्व परिंनी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये त्याचे योगदान देत आहे. चित्रपटांच्या चित्रिकरणासोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असणाऱ्या अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत लवकरच ‘जॉली एलएलबी २’ या चित्रटपटासाठीचा एक प्रमोशनल  म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित करणार असल्याचे जाहिर करत अनेकांचेच लक्ष वेधले होते. अक्षयनेही याबाबतची उत्सुकता आणखीन न ताणता हा सुरेख व्हिडिओ शेअर केला आहे.

‘जॉली गुड फेलो’ असे बोल असणारे हे नवेकोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यामध्ये मजामस्ती करणाऱ्या जॉलीच्या रुपात अक्षय आपल्या भेटीला येतो. हुमा कुरेशी, अक्षय कुमार आणि अनेक सहकलाकारांच्या साथीने या गण्याला चार चांद लावले आहेत. मीत ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या या गाण्यामध्ये अक्षय कुमार सहकलाकारांसोबत ताल धरताना दिसत आहे. तो कुठे कृष्णाची वेषभूषा केलेल्या युवकांसोबत दिसतो, तर कुठे ब्राम्हणांच्या वेशातील तरुणांसोबतही थिरकताना दिसतो. या व्हिडिओमध्ये गाण्याच्या जोडीने अक्षयचे चित्रपटातील काही संवाद, नेहमीच अनेकांवर छाप पाडणारा त्याचा अंदाजही पाहायला मिळत आहे. २०१६ या वर्षात दमदार चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांसमोर सादर केल्यानंतर आता पुन्हा एकदा बॉलिवूडचा हा खिलाडी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाद्वारे नव्या जोमाने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काही दिवसच उरले असले तरीही सध्या हा ‘जॉली गुड फेलो’ गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आला आहे असेच म्हणावे लागेल.

j-1

j2

‘जॉली एलएलबी २’ या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यापूर्वी अक्षयने त्याच्या पहिल्याच बनारस सफरीचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला होता. ‘Akshay`s First Visit To Banaras’ या नावाने हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूरही अक्षयच्या या बनारस सफरीबद्दल काही धम्माल गोष्टी सांगत आहेत. २५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये खिलाडी कुमार कधी बनारसला गेलाच नाही यावर ‘जॉली एल. एल. बी. २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांचाही विश्वास बसला नव्हता. व्हिडिओमध्ये खुद्द अक्षयसुद्दा हेच सांगत आहे की, ‘मी बनारसला पहिल्यांदाच आलो आहे’. अक्षयच्या पहिल्यावहिल्या बनारस सफरीच्या या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे काही किस्सेही सांगण्यात आले आहेत. दरम्यान, सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अनू कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकार या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

jolly-2