‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट म्हणून ‘न्यूटन’ची निवड झाल्याची घोषणा काल करण्यात आली. त्यानंतर ‘न्यूटन’ हा इराणीयन चित्रपट ‘सिक्रेट बॅलट’ची कॉपी असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, या चित्रपटाचा दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी ‘न्यूटन’ इराणीयन चित्रपटाची कॉपी नसल्याचे म्हटलेय. लोकशाही व्यवस्था आणि निवडणुका ही आपल्या समाजव्यवस्थेची दरवर्षी रंगणारी सर्कस यावर चित्रपटाची कथा आधारित आहे.

वाचा : जाणून घ्या, ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘न्यूटन’ची पहिल्या दिवसाची कमाई

‘चित्रपटाबद्दल कोणतेही मत तयार करण्यापूर्वी किंवा काहीही लिहण्यापूर्वी दोन्ही चित्रपट पाहिलेत तर बरं होईल. या चित्रपटाची कथा लिहत असताना आम्हाला ‘सिक्रेट बॅलट’बद्दल काहीही कल्पना नव्हती. ‘न्यूटन’ हा वैचारिक ताकदीचा चित्रपट आहे. जर ‘न्यूटन’ कोणत्याही चित्रपटाची कॉपी असता तर बर्लिन, ट्रिबेकामध्ये तो दाखविण्याची संधी आम्हाला मिळाली असती का? ‘न्यूटन’ कोणत्याही चित्रपटावरून कॉपी करण्यात आलेला नाही तसेच, तो कोणापासून प्रेरितसुद्धा नाही,’ असे अमित मसूरकर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ वेबसाइटला सांगितले.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘न्यूटन’ आणि ‘सिक्रेट बॅलट’च्या कथेत बरेच साम्य आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिक्रेट बॅलट’चे दिग्दर्शन बाबक पायाम यांनी केलेय. यात एका महिलेला निवडणूक अधिकारी म्हणून दुर्गम भागात पाठवण्यात आल्याचे दाखवलेय. तसेच, ‘न्यूटन’ मध्ये पंकज त्रिपाठीने साकारलेली भूमिका ही ‘सिक्रेट बॅलट’मधील सायरस अबिदीच्या भूमिकेशी साधर्म्य असणारी असल्याचे म्हटलेय. दरम्यान, आपल्यावर असा काही आरोप लावला जाईल याची ‘न्यूटन’च्या टीमने अपेक्षाही केली नव्हती.

वाचा : संकटात अडकलेल्या शाहरुखने संजूबाबाची मदत मागितली होती तेव्हा..

चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाची एकूण २६ चित्रपटांमधून ‘ऑस्कर’साठी निवड करण्याचा निर्णय ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने घेतला. ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी परभाषिक चित्रपट विभागात ‘न्यूटन’ला स्वीडनचा ‘द स्क्वायर’, जर्मनीचा ‘इन द फेड’, कंबोडियाचा ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर’ आणि पाकिस्तानच्या ‘सावन’ या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे.