बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीला काही वर्षांनी हा चिमुकला चित्रपटसृष्टीत आव्हान उभे करू शकतो. इमरानसमोर आव्हान उभे करणारा हा चिमुकला दुसरा-तिसरा कोणी नसून त्याचा मुलगा आयानच्या स्वरुपात हे आव्हान उभे राहू शकते. नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीक दरम्यान याची चुणूक पाहायला मिळाली. लॅक्मे फॅशन विकच्या पाचव्या दिवशी आयानने वडिलांसोबत रॅम्प वॉक केले. रॅम्पवरील अनोखी शैली, चालण्यातला रुबाब आणि उपस्थितांना दिलेला फ्लाइंग किस यातून आयानने सुपरस्टार होण्यासाठीचे सर्व गुण आपल्यात असल्याचे दाखवून दिले. शो संपल्यानंतर इमरानने माध्यमांशी संवाद साधला. आयानला लाइमलाइट आणि स्टेज आवडत असल्याचं आपल्या मुलातील अंगभूत गुणांचे कौतुक करताना त्याने सांगितले. आपल्याला अभिनेता व्हायचं असल्याचं आयानने आधीपासूनच निश्चित केले आहे. अपेक्षांचे ओझे मी त्याचावर लादत नाही. तो डॉक्टर, रॉकेट सायंटिस्ट अथवा त्याला जे व्हायचं आहे ते होऊ शकतो, असे तो म्हणाला. रॅम्पवर चालताना त्याला फ्लाइंग किस द्यावासा वाटला. का ते मला माहित नाही. तो वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवेल असं वाटतं, असे इमरान मिश्किलपणे म्हणाला.
‘कॅप्टन नवाब’ चित्रपटाद्वारे अभिनेता इमरान हाश्मी आता चित्रपट निर्मातीक्षेत्रात उतरला असून, इमरानने चित्रपटाचा पहिला पोस्टर ट्विटवर शेअर केला. सैनिकाच्या वेशात पोस्टरवर झळकणाऱ्या इमरानने पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांच्या सैनिकाचा पोशाख परिधान केला आहे. हे या पोस्टरचे वेगळेपण ठरते. त्यामुळे चित्रपट नक्की कशावर भाष्य करतो याबाबत चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘राज’ या भयपटाचा पुढचा भाग ‘राज रिबूट’मध्येही इमरान हाश्मी दिसणार आहे. चित्रपटात इमरान हाश्मीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांमधली अभिनेत्री कृती खरबंदाही दिसेल. भयपट साकारण्यात हातखंडा असलेले विक्रम भट यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होत असून, येत्या १६ सप्टेंबरला तो प्रदर्शित होईल.