बॉलीवूड अभिनेत्रीने प्रेमभंग झाल्याने बॉलीवूडसह हा देशच सोडून गेल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये होत आहे. परदेशातून बॉलीवूडमध्ये पदार्पणासाठी आलेल्या नर्गिस फाख्रीबाबत ही चर्चा गेले काही दिवस होत होती. मात्र, तिच्या एका ट्विटने आता संपूर्ण चित्रच पालटल्याचे दिसते.
रॉकस्टार या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या नर्गिसने अझर, हाउसफुल्ल ३, मै तेरा हिरो, स्पाय हे चित्रपट केले होते. निर्माता दिग्दर्शक आदित्य चोप्राचा भाऊ आणि अभिनेता असलेल्या उदय चोप्राशी तिचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. पण त्याच्याशी झालेल्या प्रेमभंगामुळे नर्गिसने चित्रपटसृष्टी सोडत अमेरिकेला आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते. पण तिच्या प्रतिनिधीने नर्गिसने बॉलीवूड न सोडल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला दिले आहे. हाउसफुल्ल ३च्या प्रसिद्धीवेळी नर्गिसने अचानक मध्येच प्रसिद्धी कार्यक्रम सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सर्व चर्चांना तोंड फुटले होते. उदयसोबत तिचे प्रेमसंबंध होते आणि हे दोघेही लवकरच लग्न करणार होते असेही म्हटले जात होते. मात्र, या दोघांनीही त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत कधीच ग्वाही दिली नव्हती. त्यानंतर उदयने आम्ही दोघेही केवळ चांगले मित्रमैत्रिण असल्याचे एका ट्विटद्वारे म्हटले होते. यामुळे नर्गिस नाराज झाली होती.
आता नर्गिसनेही या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे ठरविलेले दिसते. तिने गुरुवारी सकाळी तिच्या आगामी बॅन्जो चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रितेश देशमुख झळकणार आहे. त्याचसोबत तिने ट्विटरवर एक ट्विटही केलेय. त्यात तिने म्हटले की, माझं अमेरिकेतील काम संपण्याची वाट पाहत आहे. त्यानंतर काही आठवड्यांतच बॅन्जोच्या प्रमोशनला सुरुवात होईल. या ट्विटला तिने #noplanstoquit #allelsearebaselessrumours असे टॅग्स दिले आहेत.