वर्सोव्याच्या कार्यालयातील बांधकाम आणि त्यानंतर कपिल शर्माने पालिका अधिकाऱ्यांवर सोशल मीडियाद्वारे भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर तो आणि त्याचा शो वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या वादानंतर कपिल शर्माने एकूणच प्रकारावर मौन बाळगले असले तरी शोसंदर्भात नवनव्या अफवांचे पेव फुटले आहे. ‘कपिलच्या शो’चा अविभाज्य भाग असलेले क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू हे या शोमधून बाहेर पडले असल्याबद्दल एकच चर्चा सुरू झाली होती मात्र सिध्दू यांनी ‘सोनी टेलीव्हिजन’ला असे काहीही कळवले नसून ते अजूनही शोमध्ये कायम आहेत, असा अधिकृत खुलासा निर्मितीसंस्थेकडून करण्यात आला आहे. विनोदवीर कपिल शर्माचा शो सुरू झाला तेव्हापासून नवज्योतसिंग सिध्दू या शोचा भाग आहेत. त्यांचे आणि कपिलचे घनिष्ट संबंध, एकमेकांशी सततच्या संवादातून केल्या जाणाऱ्या मिश्कील टिप्पण्या हाही या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे नवज्योतसिंग सिध्दू या शोमधून बाहेर पडणार, हे कळताच एकच गोंधळ उडाला होता. क्रिकेट व्यतिरिक्त सिध्दू राजकारणातही सक्रिय आहेत. नविन पक्षात त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्यामुळे त्यांना शोच्या चित्रिकरणात भाग घेणे शक्य होणार नाही. याच कारणास्तव ते शोमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, या शोच्या सर्जनशील प्रमुख प्रीती सिमोई यांनी सिध्द यांच्यासंदर्भातील बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘नवज्योतसिंग सिध्दू यांनी शो सोडत असल्याची कुठलीही नोटीस सोनी एंटरटेन्मेटला दिलेली नाही. त्यांनी शो सोडल्याच्या बातम्या निराधार असून त्यांना उगाचच महत्व दिले जात आहे’, असे प्रीती सिमोई यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. सिध्दू यांनी शो सोडला तर निश्चितच त्याच्या टीआरपीवर परिणाम होईल मात्र सध्या तरी नव्या राजकीय भूमिकेत शिरताना आपल्याला प्रिय असलेली कपिलच्या शोमधील खास जजची भूमिका सोडायला अजून तरी सिध्दू पाजी तयार नाहीत.