विश्वरूपमच्या वादामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळाली किंवा प्रसिद्धीसाठी मी हे केले, असे म्हणणे मूर्खपणाचे असल्याचे कमल हासन यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. जयललिता यांच्या वक्तव्याचे स्वागत करीत ते म्हणाले की, आता मुख्यमंत्री जे. जयललिता आपल्याला मदत करणार असल्याने चित्रपटावरील बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची काहीच गरज नाही.
हा वाद निर्थक होता. या काळात चाहत्यांनी, रसिकांनी व प्रसार माध्यमांनीही आपल्याला साथ दिली, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
हिंदूी चित्रपटसृष्टीतील सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, महेश भट, जावेद अख्तर, मधुर भांडारकर आदी मान्यवरांनी दिलेल्या पाठिंब्याने आपण भारावल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटाचे प्रदर्शन रखडल्याने जे आर्थिक नुकसान झाले त्याबद्दलची वेदना त्याच्या बोलण्यात होती. ‘मैंने अपना सब दाव पे लगाया है’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.