बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन लवकरच एका चरित्रपटात दिसणार आहे. ‘सुपर ३०’ या आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल. यामधील आनंद कुमार यांच्या भूमिकेसाठी आधी अक्षय कुमारच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता त्याच्याऐवजी हृतिकच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

विकास बहल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटात नाव अद्याप निश्चित झालं नसून ‘सुपर ३०’ हेच नाव ठेवण्यात येईल असं म्हटलं जात आहे. पाटणा येथील आनंद कुमार यांच्या संघर्षाचं चित्रण यामध्ये करण्यात येईल. आपल्या देशात अनेकांकडे गुणवत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे, शिकण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारीही आहे. मात्र, त्यांना चांगले मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मिळत नाही. अशा मुलांसाठी आनंद कुमार यांनी ‘सुपर ३०’ हा प्रकल्प साकारला.

वाचा : ‘यूनीब्रोमुळे’ या व्यक्तीही झाल्या प्रसिद्ध

हृतिक रेहान आणि रिधान या आपल्या दोन मुलांसोबत अमेरिकेत फिरायला जाणार आहे. तिथून परत आल्यानंतर तो या चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे. ‘काबिल’च्या शूटिंगनंतर त्याच्याकडे या चित्रपटाची स्क्रिप्ट दिली गेली आणि भूमिकेविषयी बराच विचार केल्यानंतर त्याने होकार दिला. हृतिक पहिल्यांदाच एखाद्या चरित्रपटात काम करणार आहे.

anand kumar
‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार

अनेक दिग्दर्शकांना आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवायचा होता. अनेकांनी त्यासाठी त्यांची परवानगी मिळवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी सर्वांना नकार दिला होता. अखेर त्यांचा होकार मिळवण्यात दिग्दर्शक विकास बहल यांना यश मिळालं आणि आता या चरित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे.