इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या स्मृती मंधानाचे नाव चांगलेच चर्चेत आहे. आपल्या धडाकेबाज खेळीने तिने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या शैलीदार खेळीचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. स्मृतीचे हास्यही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर तिच्या लूकची अभिनेत्री दिशा पटानीशी तुलना करण्यात आली. सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या स्मृतीची शाहरुख खान किंवा सलमान खान नाही, तर हृतिक रोशनबरोबर डेटवर जाण्याची इच्छा आहे. ‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात स्मृतीने ही इच्छा व्यक्त केली.

आपल्या आवडीनिवडी आणि इतर अनेक विषयांवर स्मृतीने या कार्यक्रमात चर्चा केली. भविष्यात संधी मिळाली तर हृतिक रोशनला डेट करायला आवडेल, असे तिने म्हटले. बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिकच्या महिला चाहत्यांचीही संख्या काही कमी नाही. अरिजीत सिंग हा आपला आवडता गायक असल्याचेही स्मृतीने सांगितले.

स्मृतीसोबत या कार्यक्रमात भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीसुद्धा उपस्थित होती. एखाद्या बॉलिवूड स्टारपेक्षा आपल्याला हॉलिवूडच्या अभिनेत्याला डेट करायला आवडेल, असे झुलनने यावेळी सांगितले. तर वेदा कृष्णमूर्तीने रणवीर सिंगला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली.