टेलिव्हिजनवरील ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला कोरिओग्राफर रेमो डिसूझा याने नृत्यावरील पहिला थ्रीडी चित्रपट दिग्दर्शित केला. ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं. त्यानंतर आता रेमोने ‘एबीसीडी ३’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेता वरुण धवन यामध्ये झळकणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.

‘डान्स प्लस ३’च्या सेटवर आपल्या ‘जुडवा २’ चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचलेल्या वरुणला रेमोने घोषणा करताच सुखद धक्का बसला. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘एबीसीडी’ (एनीबडी कॅन डान्स) या चित्रपटात यात प्रभुदेवा, गणेश आचार्य यांसारख्या मातब्बरांसोबत ‘रिअ‍ॅलिटी शो’मधून प्रकाशझोतात आलेले युसूफ खान, धर्मेश येलांडे, पुनीत पाठकसारख्या डान्सर्सनी भूमिका साकारलेली. हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर रेमोने २०१५ मध्ये ‘एबीसीडी २’ची निर्मिती केली. यामध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका होती. आता ‘एबीसीडी ३’ची घोषणा करत त्यामध्ये वरुणसोबतच धर्मेश, राघव आणि पुनितसुद्धा भूमिका साकारणार असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.

वाचा : बिग बी, अक्षय कुमारकडून ‘न्यूटन’चं कौतुक 

रेमोच्या ‘एबीसी़डी’ सीरीजमुळे बॉलिवूडमध्ये डान्सवर आधारित चित्रपटांचं महत्त्व वाढलं. वरुणचं डान्सवरील प्रेमही सर्वश्रुत आहे. त्यामुळे पडद्यावर रेमो आणि वरुण ही जोडी पुन्हा एकदा काय कमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.