२०१३ साली राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांपासून ते तिकीटबारीवरच्या प्रेक्षकांच्या प्रतिसादापर्यंत सगळीकडे यश मिळवले. पाठोपाठ २०१४ साली ओमंग कुमार दिग्दर्शित ‘मेरी कोम’ प्रदर्शित झाला. त्यालाही चांगले यश मिळाल्यानंतर बॉलीवूडमध्ये गेले वर्षभर केवळ चरित्रपटांचीच चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे चर्चेत असलेल्या या चरित्रपटांची लाटच यावर्षी एकामागोमाग एक प्रदर्शित होणार आहे.

चरित्रपट हमखास यशस्वी होत आहेत, हे लक्षात आल्यानंतर गेल्या वर्षी एकापाठोपाठ एक चरित्रपटांची घोषणा करण्यात आली होती. यात निम्मे चित्रपट हे खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित आहेत. ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘मेरी कोम’ दोन्ही चित्रपट ज्येष्ठ ऑलिम्पिक धावपटू मिल्खा सिंग आणि बॉक्सर मेरी कोम यांच्या आयुष्यावर बेतले होते. दोन वेगवेगळ्या काळातील कथाचित्रण असूनही या दोन्ही चित्रपटांना लक्षणीय प्रतिसाद मिळाला हे बॉलीवूड दिग्दर्शकांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. त्यामुळे आता वर्षभराने पुन्हा एकदा या चरित्रपटांचा ट्रेंड रुजू झाला आहे. यावर्षी चरित्रपटांचा शुभारंभच  नवीन वर्षांच्या पहिल्या महिन्यापासून होणार आहे. राजकुमार हिरानी यांची निर्मिती असलेला, आर. माधवन अभिनीत ‘साला खडूस’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होतो आहे. एका मासेविक्री करणाऱ्या तरुणीला बॉक्सरमध्ये बदलणाऱ्या प्रशिक्षकाची खरी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यानंतर फेब्रुवारीत हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगढ’ हा समलिंगी प्राध्यापकाच्या वास्तव कहाणीवर बेतलेला चित्रपट प्रदर्शित होईल. मनोज वाजयपेयीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून पुरस्कार मिळवले आहेत.

याशिवाय, खेळांनाही बाजूला सारत काही खऱ्या घटनांवर आधारित चित्रपटही यावर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. १९९१ साली पाकिस्तानमध्ये दहशतवादी म्हणून कैदेत ठेवलेल्या सरबजित सिंगची कथाही याच वर्षी पडद्यावर येणार आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात सरबजीत सिंगची कथा त्याच्या बहिणीच्या दलबीरच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आली आहे. दलबीरच्या भूमिकेत ऐश्वर्या राय दिसणार आहे. सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘नीरजा’ आणि अक्षय कुमार-निम्रत कौर जोडीचा ‘एअरलिफ्ट’ हे दोन्ही चित्रपटही याच पठडीत मोडणारे आहेत.

एवढे चरित्रपट कमी पडत आहेत की काय म्हणून याही वर्षी आणखी चरित्रपटांची घोषणा झाली आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवालवरच्या चित्रपटाची घोषणा झाली असून दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार आहे. कुस्तीवीर गामा पहलवानची कथा दिग्दर्शक परमीत सेठी पडद्यावर आणणार असून ‘पिकू’ फेम दिग्दर्शक शूजित सरकार फुटबॉलपटू सिबदास भादुरींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करणार आहे. दिग्दर्शक करण जोहरनेही ध्यानचंद यांच्या चित्रपटावरची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढची दोन र्वष ही चरित्रपटांची लाट कायम राहाणार आहे.

खेळाडूंवरचे चित्रपट

यावर्षी तीन वेगवेगळ्या खेळाडूंवरचे चित्रपट विविध कारणांनी चर्चेत आहेत. महेंद्र सिंह धोणी याच्या आयुष्याची चित्तरकथा रंगवणाऱ्या ‘एमएस धोणी अ‍ॅन अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘स्पेशल २६’ फेम नीरज पांडेने केले आहे. सुशांत सिंग राजपूतला धोनीच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता अनेकांना आहे. पाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान अझरुद्दीन याच्या आयुष्यातील वादग्रस्त घटनेचा वेध घेणारा ‘अझर’ या टोनी डिसूझा दिग्दर्शित चित्रपटाबद्दलही उत्सुकता आहे. अभिनेता इम्रान हाश्मी याने अझरची भूमिका केली आहे. गेले वर्षभर आपल्या भूमिकेसाठी मेहनत घेणाऱ्या आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपटही माजी कुस्तीवीर महावीर फोगट यांच्यावर आधारित आहे. आपल्या मुलींना कुस्तीत प्रशिक्षित करण्यासाठी महावीर फोगट यांना जो संघर्ष करावा लागला त्याभोवती हा चित्रपट फिरतो. याही चित्रपटाचे दिग्दर्शन ‘भूतनाथ रिटर्न्‍स’ फे म नितेश तिवारीसारख्या चांगल्या दिग्दर्शकाचे आहे. आमिरच्या या भूमिकेशी साधम्र्य असणारी भूमिका सलमान खान ‘सुलतान’ या यशराजच्या आगामी चित्रपटात करतो आहे. त्यामुळे या दोन खानांच्या मैत्रीत आलेल्या वितुष्टामुळेही ‘दंगल’बद्दलची चर्चा आणखीनच वाढली आहे.