मैत्री, त्यातही तीन मित्रांची मैत्री, जगासमोर मांडणारे अनेक चित्रपट आतापर्यंत बॉलिवूडमध्ये आले आहेत. ‘दिल चाहता है’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांनी कमावलेले यश लक्षात घेता तीन मित्रांच्या मैत्रीचा हा ‘फॉम्र्युला’ चांगलाच यशस्वीही झाला. आता हाच फॉम्र्युला डेव्हिड धवन ‘चष्मेबद्दूर’मध्ये वापरत आहे.
सध्याच्या काळात तरुणांसाठी मैत्रीचे नाते हे सर्वात जास्त जवळचे असते. प्रेम प्रकरणांपासून ते घरच्या कटकटींपर्यंत सगळ्या गोष्टी जवळच्या मित्राबरोबरच ‘शेअर’ करण्याकडे तरुणाई भर देते. तरुणांसाठी दोस्तीचे नाते हे सख्ख्या नात्यापेक्षा मोठे असते. नेमक्या याच गोष्टीवर भर देत आपण ‘चष्मेबद्दूर’ घेऊन येत आहोत, असे डेव्हिड धवनने सांगितले.
हा नवीन ‘चष्मेबद्दूर’ जुन्या ‘चष्मेबद्दूर’चाच रिमेक आहे. पण यात डेव्हिड धवनने दोस्तीवर जास्त भर दिला आहे. तीन मित्रांना एकाच मुलीबद्दल वाटणारे आकर्षण आणि त्यातून होणाऱ्या गमतीजमती हा या चित्रपटाचा विषय असला, तरीही या तीन मित्रांमधल्या नात्याला आपण केंद्रस्थानी ठेवल्याचे त्याने सांगितले.