एस. राजमौली यांच्या आगामी ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटातून बाहुबलीच्या मृत्यूचे गुढ उलगडणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. एस. राजमौली यांचा बहुचर्चित चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपट लीक होऊ नये, यासाठी चित्रपटाची टीम खास काळजी घेताना दिसत आहे. ज्या ठिकाणी बाहुबली २ चे अंतिम एडिटिंग करण्यात येत आहे, त्याठिकाणी मजबूत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पायरसी प्रकार रोखण्यासाठी याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून चित्रपटाच्या एडिटिंग रुममध्ये फक्त सात लोकांना जाण्याची परवानगी आहे. दिग्दर्शक एस. एस. राजमौली आणि निर्माता शोबू यांच्या व्यतिरिक्त केवळ पाच लोक याठिकाणी जाऊ शकतात. जर चित्रपटातील कलाकारांना कोणत्या कारणास्तव या ठिकाणी जाण्याची गरज पडली, तर कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना याठिकाणी प्रवेश दिला जातो.

बाहुबली या चित्रपटासंदर्भातील उत्सुकता पाहायला मिळत असताना नोव्हेंबरमध्ये या चित्रपटातील पाच मिनिटांचा युद्धभूमीवरील प्रसंग ऑनलाइन उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळाले होते. एवढेच नाही तर या चित्रपटाचा ट्रेलर देखील ऑनलाइन उपलब्ध झाला होता. या दोन घटनांची पुनरावृत्ती होऊन चित्रपटावर परिणाम होऊ नये, यासाठी निर्मात्यांनी बाहुबलीच्या अंतिम एडिटिंगवेळी सुरक्षा कवच निर्माण केले आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रटासंदर्भातील कोणत्याही सीनवर भाष्य करु नये, अशा सूचना देखील संबंधित कलाकारांना निर्माता आणि दिग्दर्शकांकडून मिळाल्या आहेत.

पहिल्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडल्यानंतर आता हा चित्रपट आपलाच विक्रम मोडीत काढून नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा चित्रपटाच्या टीमला विश्वास आहे. ‘बाहुबली’ हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रटगृहात गेलेल्या प्रेक्षक कटप्पाने बाहुबलीला का मारले? हा प्रश्न डोक्यात घेऊन बाहेर पडला होता. एस. एस. राजमौली आगामी चित्रपटातून प्रेक्षकांना पडलेल्या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. हा चित्रपट २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.