‘गोलमाल अगेन’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसतोय. आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमाची तगडी स्पर्धा असूनही ‘गोलमाल अगेन’ची गाडी कुठेही थांबलेली दिसत नाही. ‘गोलमाल अगेन’मधील स्टारकास्ट आणि कॉमेडी हे दोन फॅक्टर सिनेमाच्या यशाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत. याशिवाय, सिनेमाला माऊथ पब्लिसिटीचाही चांगलाच फायदा झालाय. पहिल्याच दिवसी ३०.१४ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने साधारणपणे २८.३७ कोटींची कमाई केली.

विकेण्डच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये या सिनेमाने भारतात एकूण ५८.५१ कोटी रुपयांची कमाई केली. व्यापार विश्लेषक तरण आदर्शने या संदर्भात ट्विट करत म्हटले की, हा सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील गाडी कुठेही थांबायचे नाव घेत नाही. रविवारी या सिनेमाने ३३.४९ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने एकूण ९२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

दिवाळीच्या मुहुर्तावर बॉलिवूडमधील दोन तगड्या अभिनेत्यांचे दोन सिनेमे एकत्र प्रदर्शित झाले होते. ‘गोलमाल’प्रमाणेच ‘सिक्रेट सुपरस्टार’ही चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमात झायरा वसीम आणि आमिर खान यांची मुख्य भूमिका आहे. ‘गोलमाल’च्या आधीच्या भागात ‘वसूली भाई’, ‘बबली भाई’ आणि ‘पांडुरंग’ या व्यक्तिरेखा दाखवण्यात आल्या होत्या. नव्या भागातही या व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे तेवढेच मनोरंजन करताना दिसतात. आतापर्यंत दिग्दर्शक रोहित शेट्टी याने ‘गोलमाल’ सिरीजमधून प्रेक्षकांना विनोदासोबत अॅक्शनचा तडकाही दिला आहे. पण यावेळी कॉमेडी आणि अॅक्शनच्या जोडीला हॉररची फोडणीही दिली आहे.