ऑस्कर पुरस्कारांसाठीची सर्व तयारी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. कोणत्या कालाकाराला कोणत्या पुरस्कारासाठीचे नामांकन मिळाले आहे इथपासून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी यंदाच्या वर्षी कोण पार पाडणार याबद्दल सोशल मीडियावरही बऱ्याच चर्चा रंगत आहे. ऑस्कर म्हणजे कोणत्याही कलाकारासाठी एक हवेहवेसे स्वप्न आहे. भारतीय कलाकारांमध्येही या पुरस्काराबद्दल उत्सुकता पाहायला मिळते. त्यातच यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल याला ‘लायन’ या चित्रपटाकरिता नामांकन मिळाले आहे. त्यामुळे ही अनेकांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे. ऑस्करचे नामांकन मिळणरा देव पटेल हा भारतीय वंशाचा तिसरा कलाकार आहे.

भारतीय अभिनेत्रींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ऑस्करच्या आजवरच्या शर्यतीत फक्त आणि फक्त एकाच अभिनेत्रीला नामांकन मिळाले होते. भारतीय वंशाच्या मेर्ले एबरॉन या पहिल्या अभिनेत्रीला ऑस्करसाठीचे नामांकन मिळाले होते. पण, चित्रपटातील कारकीर्दीसाठी मेर्लेला तिची ओळख लपवावी लागली होती. ‘स्कुपव्हूप’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १९११ मध्ये मुंबईत जन्मलेल्या मेर्लेचा सांभाळ तिच्या आजीने केला होता. १९२८ मध्ये इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर तिच्यावर हंगेरियन चित्रपट दिग्दर्शक अलेक्झॅंडर कोर्डा यांची नजर पडली. कोर्डा यांनी मेर्लेला एका चित्रपटाचा प्रस्तावही दिला होता. कालांतराने मेर्ले आणि कोर्डा यांनी लग्न केले. त्यावेळी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत मेर्लेच्या नावाचाही समावेश होता. पण, पूर्वी हॉलिवूडमध्ये गव्हाळ वर्ण असणाऱ्या मुलींना चित्रपटांमध्ये घेतले जात नव्हते. त्यामुळे सावळा वर्ण लपविण्यासाठी मेर्ले विना मेकअप कधीही कोणासमोर, विशेषत: प्रसारमाध्यमांसमोर येत नसत.

ae2b4d50-ae40-4491-bb69-bf91ec2bed51

मेर्ले आज आपल्यात नसली तरीही तिच्या काही आठवणी आणि या अभिनेत्रीचे काही किस्से यांबद्दल नेहमीच अनेकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. मेर्ले आणि कोर्डा यांच्या नात्यावर कधीही कोणी प्रश्नचिन्ह उभे केले नाही. १९३७ मध्ये झालेल्या एका अपघातानंतर मेर्लेच्या कारर्दीमध्ये काहीसे वाईट दिवस सुरु झाले होते. पण, ‘वुथरिंग हाइट्स’ या चित्रपटाद्वारे तिने दमदार पुनरागमन करत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली होती.