ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इराणी दिग्दर्शक असगर फरहादी यांच्या ‘द सेल्समॅन’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट विदेशी सिनेमाचा पुरस्कार मिळाला. पण ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध दर्शवत असगर फरहादी यांनी सोहळ्यात जाऊन पुरस्कार घेण्यास नापसंती दर्शवली. त्यांच्यावतीने व्यासपिठावर गेलेल्या प्रतिनिधीने, त्यांनी लिहिलेले एक पत्र यावेळी वाचून दाखवले. त्या पत्रात असगर यांनी ट्रम्प सरकाची निंदा केली होती.

सर्वसाधारणपणे ऑस्करमध्ये ज्या वक्तिला पुरस्कार मिळतो, तिच व्यक्ती तो पुरस्कार घ्यायला जाते. कोणाच्याही प्रतिनिधीला पुरस्कार घेण्याची परवानगी नसते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तरच ऑस्कर पुरस्कार त्या वक्तिची प्रतिनिधी स्वीकारु शकते असा ऑस्करचा नियम आहे. असे असले तरी बहुधा असगर फरहादी यांच्यासाठी ऑस्करने आपले नियम बदलले असेच म्हणावे लागेल.

इराणी- अमेरिकी अंतराळ पर्यटक अनुशेह अंसारी यांनी असगर फरहादी यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अनुशेह म्हणाल्या की, ‘असगर यांच्यासाठी हा फार कठीण निर्णय होता. असा निर्णय घेण्यासाठी खूप हिंमत लागते.’

ऑस्करसाठी त्यांच्या सिनेमाला नामांकन मिळाल्यानंतर असगर यांनी सांगितले होते की, जरी त्यांना अमेरिकेत येण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली तरीही ते ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. फरहादी यांचा ‘द सेल्समॅन’ या सिनेमाला ८९ व्या ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेचा पुरस्कार या विभागात नामांकन मिळाले होते आणि या विभागाचा पुरस्कारही त्यांनी पटकावला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२० दिवसांसाठी शरणार्थी असलेल्यांना अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. तसेच इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सूडान आणि यमन यांसारख्या देशातील नागरीकांना ९० दिवसांसाठी अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्यात आली होती. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर फरहादी यांचे हे स्पष्टीकरण आले होते.

या पत्रात त्यांनी म्हटले की, ‘मी माझ्या सिनेसृष्टीतील साथिदारांसोबत ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना भेटू शकत नाही याचे मला वाईट वाटत आहे. माझ्या देशासह इतर सहा देशातील नागरीक अधिकृतरित्या अमेरिकेत प्रवेश करतात असे असले तरी जर त्यांच्यावर हा प्रतिबंध लादण्यात येणार असेल तर मी याची निंदा करतो.’