ऑस्कर पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत असलेला एक चित्रपट म्हणजे ‘लायन’. या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावरही सुरु आहे. ‘लायन’ चर्चेत येण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे या चित्रपटासाठी भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल यालासुद्धा ऑस्करसाठीचे नामांकन मिळाले आहे. त्यामुळे आता हा ‘लायन’ ऑस्करची मानाची सोन्याची बाहुली पटकावण्यात यश मिळवतो का? याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘लायन’च्या निमित्ताने देवसोबतच आणखी एक चेहरा चर्चेत आला आहे. किंबहुना नुकत्याच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब आणि इतर पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्याच चेहऱ्यावर अनेकांच्या कुतुहलपूर्ण नजरा खिळल्या होत्या. तो चेहरा म्हणजे बालकलाकार सनी पवार. मुंबईचा सनी पवार सध्या ऑस्कर आणि हॉलिवूडमधील सर्वांचे लक्ष वेधणारा बालकलाकार ठरला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याचा अंदाज, ‘बहुत, बहुत अच्छा लगा…’असं म्हणत मोजक्या पण तितक्याच खऱ्या भावनेने प्रश्नांची उत्तरं देणारा सनी सर्वांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी झाला आहे असेच म्हणावे लागेल.

‘अॅक्सेस हॉलिवूड’ या युट्यूब वाहिनीद्वारे सनीच्या एका मुलाखतीतील काही भाग प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सनीची ही मुलाखत आकर्षणाचा विषय ठरत आहे. मुंबईतील एका सर्वसामान्य कुटुंबातील सनीच्या आयुष्याला मिळालेल्या कलाटणीची त्याच्या वडिलांनाही अपेक्षा नव्हती असे ते इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले. सरू ब्रायरर्ली या ऑस्ट्रेलियात दत्तक गेलेल्या मुलाने तीन दशकांनंतर भारतात हरविलेल्या आपल्या घराचा शोध गुगल मॅपच्या आधारे घेतला. येथील कुटुंबाच्या भेटीनंतर त्याने त्यावर लिहिलेल्या ‘ए लाँग वे होम’ या आत्मवृत्ताचा चित्रपटीय आविष्कार ‘लायन’ या नावाने यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत सहा नामांकनासह दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियातील दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांनी सरूची कथा सादर केली आहे.

sunny_pawar1

‘लायन’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच हॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सनी पवारने ही सर्व दुनिया त्याच्या नजरेतून आणि त्याच्या शब्दांतून या मुलाखतीत व्यक्त केली आहे. हॉलिवूड चित्रपटसृष्टीत कोणत्या कलाकाराला भेटण्याची तुझी इच्छा आहे असे विचारले असता सनीने निरागसपणे, ‘डब्ल्यू डब्ल्यू इ’ मधल्या काही आवडत्या खेळाडूंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. इंग्रजी भाषा येत नसतानाही ज्या आत्मविश्वासाने सनी हॉलिवूडमध्ये कलाकारांसोबत वावरतो, प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देतो हे खरंच कौतुकास्पद आहे.

d

प्रसिद्ध दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांनी चित्रपटासाठी निवड कशी केली असा प्रश्न विचारला असता सनी म्हणाला, एअर इंडियाच्या शाळेत असताना एकदा मला एका ठिकाणी नेलं. माझे बाबा तेव्हा खालीच होते आणि मला वर नेण्यात आलं होतं. त्यावेळी आम्हाला खेळायला सांगितलं आणि त्यानंतर झालेल्या अभिनयासाठीच्या कार्यशाळांनासुद्धा मी हजेरी लावली. या सर्व प्रक्रियनंतर गार्थने येऊन चित्रपटासाठी माझी निवड केली. या मुलाखतीदरम्यान सनीने त्याला विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरं देत मुलाखतकारांचीही मने जिंकली आहेत. याच मुलाखतीतील काही क्षण जरुर पाहा…