अमेरिकेत रविवार रात्र आणि भारतात सोमवार सकाळ ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळ्याने दुमदूमणार आहे. जगभरातील अब्जावधी चित्रपट प्रेक्षकांसाठी ही एक वार्षिक पर्वणीच म्हणता येईल. ‘अॅण्ड ऑस्कर गोज् टू..’ हे वाक्य संपताच मनात होणारी हूर.. हूर.. , सभोवतालची शांतता आणि त्या शांततेने निर्माण केलेली उत्सुकता याने एक वेगळेच वातावरण निर्माण होते. शांततेतील उत्सुकता, नामनिर्देशन झालेल्यांच्या हालचाली आणि ऑस्कर मिळाल्यानंतर चेहऱ्यांवर ओसंडणारे हास्य या हास्याला प्रेक्षागृहातील हजारो मान्यवरांकडून मिळणारी कौतुकाची पोचपावती अशा काहिशा वातावरणात पुरस्कार सोहळ्याची सांगता होते. ‘ऑस्कर’ म्हणताच रोमांचित झाला नाही असा चित्रपट प्रेक्षक शोधणे कठीण…. मग तो प्रेक्षक इंग्रजी चित्रपट पाहणारा असो वा नसो. हॉलीवूडच्याच नव्हे तर जगातील प्रत्येक भाषेतील अभिनेत्यांना, दिग्दर्शकांना, निर्मात्यांना ओढ असते ती ऑस्कर मिळविण्याची. चित्रपटसृष्टीत आल्याचे सार्थक समाधान मिळवून देणारा असा हा ‘ऑस्कर सोहळा’ असतो. मात्र, ऑस्कर पटकाविणे हे काही सोपे काम नसते. त्यासाठी या कलाक्षेत्रात काम करणा-या प्रत्येक व्यक्तिला या‘ऑस्कर पुरस्कार’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही नियम व अटींची पूर्तता करणे गरजेचे असते त्या अटींसदर्भात घेतलेला आढावा…
१. ‘ऑस्कर पुरस्कार’ स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या चित्रपटाची लांबी कमीत कमी ४० मिनिटे असणे अपेक्षित आहे. अन्यथा तो चित्रपट ग्राह्य धरला जात नाही.
२. चित्रपटाची प्रिंट ३५ MM ते ७० MM किंवा २४ फ्रेम ते ४८ फ्रेम अथवा १०८० पिक्सेल ते २०४८ पिक्सेल असणे गरजेचे असते.
३. या स्पर्धेत सहभागी झालेला चित्रपट १ जानेवारी ते ३१ डिसेंबरपर्यंत ‘लॉस एन्जेलिस’ येथे प्रदर्शित झालेला असणे गरजेचे आहे.
४. चित्रपट ‘इंग्रजी’ भाषेत असणे गरजेचे आहे. अन्यथा त्या चित्रपटाला ‘परदेशी भाषेतील चित्रपट’ या गटातच नामांकन मिळवता येते.
५. इतर भाषेतील चित्रपटांचे शीर्षक हे त्या भाषेसह इंग्रजी भाषेत असणेही गरजेचे असते.
६. चित्रपटातील कलाकारांनी त्यांचे आवाज स्वतः डब करणे गरजेचे असते. एखाद्या कलाकाराचा आवाज दुस-या व्यक्तिने ‘डबिंग’ केल्यास त्याला स्पर्धेत कोणत्याच गटात ग्राह्य धरले जात नाही.
७. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी १० तर सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्री या विभागात जास्तीत जास्त ५ कलाकारांनाच नामांकन मिळते. काही अपवादात्मक परिस्थितीत त्यांची संख्या कमी होऊ शकते पण ही संख्या वाढत नाही.
८. ‘अमेरिकन अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अॅण्ड आर्ट्स सायन्स’ संस्थेचे सभासद आणि ६००० हजार पेक्षा जास्त चित्रपट समीक्षक मतदान करुन स्पर्धेचा अंतिम निकाल देतात.
९. १९५० नंतर केलेल्या नियमानुसार विजेत्याला ऑस्करची ट्रॉफी विकता येत नाही. जर कोणत्याही कलाकाराला आपली ट्रॉफी विकायची असेल तर फक्त ‘अमेरिकन अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अॅण्ड आर्ट्स सायन्स’ संस्थेलाच ती विकावी लागते. त्याचे मूल्यही केवळ एक यूएस डॉलर इतकेच मिळते.
१०. प्रत्येक निर्मात्याला अधिकृत ‘स्क्रीन क्रेडिट फॉर्म’ अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन भरणे आवश्यक असते. अन्यथा तो चित्रपट स्पर्धेतून बाद केला जातो.