बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे काही पुरस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे संपूर्ण जगातील चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी अकॅडमी अवॉर्ड्स म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांना फार महत्त्व दिले जाते. संपूर्ण चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्याच नजरा लागून राहिलेल्या या पुरस्कांरांच्या आगामी सोहळ्याचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध टेलिव्हीजन होस्ट जिमी किम्मेल करणार आहे. २०१७ च्या ऑस्कर पुरस्कारांच्या सूत्रसंचालनाची धुरा प्रसिद्ध सूत्रसंचालक जिमी सांभाळणार असल्यामुळे त्याची लोकप्रियता पाहता प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अकॅडमी अवॉर्ड्सच्या अधिकृत अकाऊंटवरुनही या बातमीला दुजोरा देण्यात आला होता.

जिमीने याआधीही विविध पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन केले आहे. २०१६ एमी पुरस्कारांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही जिमी किम्मेलनेच केले होते. या पुरस्कारांच्या २०१२ साली पार पडलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही जिमीनेच केले होते. पण, ऑस्कर पुरस्कारांसाठी जिमी पहिल्यांदाच सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे.

डिस्ने आणि एबीसी टेलिव्हीजन ग्रुपचे मुख्य बेन शेरवूड यांनी एमी पुरस्कारांच्या सूत्रसंचालनाची मोठी जबाबदारी जिमीच्या हाती दिली होती. जिमीने ती जबाबदारी अगदी चोखंदळपणे पार पाडली. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यातील जिमीचे सादरीकरण पाहता ऑस्करच्या सूत्रसंचालनासाठी त्याची वर्णी लागली असल्याचेही म्हटले जात आहे. सोशल मीडिया आणि चित्रपट वर्तुळामध्येही सध्या जिमीच्याच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. त्याच्या नावाभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय आणि सूत्रसंचालनासाठी त्याला मिळालेली लोकप्रियता पाहता आता सर्वांचेच लक्ष या अकॅडमी पुरस्कारांकडे लागून राहिले आहे.