‘लायन’ चित्रपटात लहानग्या सरूची भूमिका साकारुन जगभरातील सिनेप्रेक्षकांना प्रेमात पाडणाऱ्या मुंबईकर सनी पवारची जादू ८९ व्या ऑस्कर पुरस्कारातही दिसली. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याऱ्या जिमी किम्मेलने सनी पवारशी खास संवाद साधला आणि त्याला काही मजेदार प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे तितक्याच मजेदार पद्धतीने सनीने दिली. कुठल्याही सर्वसाधारण आठ वर्षांच्या मुलाप्रमाणेच दिसणारा सनी आज मात्र आंतरराष्ट्रीय ‘स्टार’ कलाकार आहे. त्याने लायन चित्रपटात केलेली सरूची भूमिका चित्रपटाची मोठी जमेची बाजू होती असे समीक्षकांनीही मान्य केले आहे.

कलिना ते ‘लायन’पर्यंत झालेला सनीचा प्रवास खूप मोठा आणि उल्लेखनीय असाच आहे. या चित्रपटामूळे त्याचे अवघे जगच बदलून गेले. ‘लायन’ या चित्रपटात सरू ब्रायरर्ली या मूळ भारतीय असलेल्या पण ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने दत्तक घेतल्यामुळे तिथेच लहानाचा मोठा झालेल्या तरुणाची सत्यकथा आहे.

सरू मूळचा मध्य प्रदेशातल्या खांडव्या भागातला. एकेदिवशी पोटाची खळगी भरण्यासाठी भावाबरोबर निघालेला सरू चुकून एका ट्रेनमध्ये बसतो. ही ट्रेन त्याला आपल्या घरापासून १६०० किमी दूर असलेल्या कलकत्यात आणून सोडते. ‘लायन’चा पहिला भाग हा पूर्णत: कलकत्यात हरवलेल्या सरूचा म्हणजेच पर्यायाने सनीच्या अभिनयाने नटलेला आहे. लहानग्या सरूच्या भूमिकेसाठी तीन मोठ्या शहरांमधून तब्बल दोन हजार मुलांच्या ऑडिशन्स घेतल्या होत्या.

पुन्हा काही जणांची निवड केली. या पात्रासाठी आम्ही खूप आशा लावून बसलो होतो, अशी माहिती या चित्रपटाचे कास्टिंग डिरेक्टर कस्र्टी मॅकग्रेगर यांनी दिली. सनीचा निरागस चेहरा आणि त्याचे बोलके डोळे, त्याचा आवाज या सगळ्यामुळे आम्ही सनीची निवड केली. त्याला आयुष्यभर अभिनय करायला आवडेल, असंही तो विश्वासाने सांगतो. ‘लायन’ला ऑस्कर पुरस्कार कितीही मिळाले तरी छोट्या सनीने त्या पुरस्कारांपलीकडे जाऊन आपली ओळख बनवली आहे हे नक्की.