दर्जेदार अभिनयाने छाप पाडणारा अभिनेता राजकुमार राव सध्या ‘न्यूटन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अन्य दिग्गज कलाकारांनाही राजकुमार रावचे कौतुक केले. ‘न्यूटन’मधील अभिनयासाठीसुद्धा त्याची फारच प्रशंसा केली जात आहे. इतकच नव्हे तर २०१८ मध्ये होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांसाठीही भारताकडून या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. तसं पाहिलं तर आपल्या कारकिर्दीतील प्रत्येक चित्रपटाला अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या राजकुमारसाठी ‘न्यूटन’ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

अफलातून कलाकृती साकारण्यासाठी प्रत्येक कलाकार त्याचं सर्वस्व पणाला लावतो. राजकुमारनेही न्यूटनच्या वेळी असंच काही केलं ज्यामुळे त्याने अनेकांची मनं जिंकली. सध्या या चित्रपटाविषयीच्या विविध चर्चांमध्येच आणखी एका गोष्टीचा उलगडा झाला आहे. छत्तीसगडच्या घनदाट जंगलांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं. त्याचवेळी राजकुमारच्या आईचं निधन झालं. चित्रीकरण करत असलेल्या ठिकाणी मोबाईललाही नेटवर्क नसल्यामुळे त्याच्यापर्यंत आईच्या निधनाची बातमी तशी उशीराच पोहोचली.

आपल्या आईचं निधन झाल्याचं कळताच राजकुमार लगेचच रायपुरला रवाना झाला जेणेकरुन तो लगेचच परतू शकेल. आईसोबत फार जवळचं नातं असललेला राजकुमार तिच्या निधनामुळे खचला असून आता तो काही दिवसांनंतरच चित्रीकरणासाठी परतेल असाच अंदाज अनेकांनी बांधला. पण, चित्रपटाची संपूर्ण टीम जंगलामध्ये असून आपण चित्रीकरणाला हजेरी लावली नाही तर त्यांच्या अडचणी वाढतील, याचा राजकुमारने पूर्ण विचार केला आणि आईचे अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो चित्रीकरणासाठी पुन्हा हजर झाला.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

त्याचं हे असं अचानक परतणं सर्वांसाठी अनपेक्षित होतं. पण, त्याचा सर्वांनाच अभिमानही वाटत होता. याविषयीच एका मुलाखतीत सांगताना राजकुमार म्हणाला होता, ‘मी आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चित्रीकरणासाठी गेलो. कारण मला माहित आहे, की दिलेल्या शब्दाला आपला मुलगा जागत आहे हे पाहून आईला माझा अभिमानच वाटेला असेल.’