कलिनाच्या ‘एअर इंडिया मॉडर्न’ शाळेत शिकणाऱ्या छोटय़ा सनीसाठी इतर दिवसांप्रमाणेच तोही दिवस उगवला होता. त्या दिवशी शाळेतल्या काही मुलांना वर्गात बसवण्याऐवजी मैदानात खेळायला सोडलं होतं. कधी नव्हे इतका वेळ सनी इतर मुलांबरोबर मैदानात खेळत होता. तो सांगतो,‘आम्ही तिथे का खेळत होतो?, हे मला माहिती नव्हतं. पण खूप वेळ खेळून खेळून मजा आली होती. दिवसभर खेळल्यानंतर कोणीतरी सांगितलं की तो खेळ एका चित्रपटाचा भाग होता.’ दोन वर्षांपूर्वी ज्या चित्रपटासाठी सनी खूप वेळ खेळला होता आज त्याच ‘लायन’चा तो अविभाज्य भाग आहे.

ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेव्हिसच्या ‘लायन’ या चित्रपटाला ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी सहा नामांकने मिळाली आहेत. सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट अभिनेता (देव पटेल), सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री (निकोल किडमन) आणि सवरेत्कृष्ट पटकथा (सरू ब्रायरर्ली यांचे ‘अ लाँग वे होम’) यासह आणखी दोन विभागात चित्रपटाला नामांकने आहेत. या नामांकनांमध्ये सनीचा उल्लेख नसेलही पण ज्यांनी ज्यांनी ‘लायन’ पाहिला आहे ते सगळेच या चित्रपटात लहानग्या सरूची भूमिका साकारणाऱ्या छोटय़ा सनी पवार या मुंबईकर मुलाच्या प्रेमात आहेत. सनीचा सहज अभिनय ही या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे, असं समीक्षकांनीही मान्य के लं आहे. कलिना ते ‘लायन’पर्यंत झालेला सनीचा प्रवास खूप मोठा आणि उल्लेखनीय असाच आहे. कुठल्याही सर्वसाधारण आठ वर्षांच्या मुलाप्रमाणेच दिसणारा सनी आज आंतरराष्ट्रीय ‘स्टार’ कलाकार आहे. सध्या ‘लायन’च्या प्रसिद्धी कार्यक्रमांसाठी म्हणून ठिकठिकाणी मुलाखतींसाठी जाणं, दिवस-दिवस मुलाखती देणं यात सनी आणि त्याचे बाबा दिलीप पवार हरवून गेले आहेत. या दिवसभर चालणाऱ्या सलग मुलाखतींच्या कार्यक्रमामुळे सनी थकून जाईल की काय, अशी भीती त्याच्या वडिलांना छळत असते. या चित्रपटामुळे अवघं जग बदलून गेलं आहे, इतकी प्रसिद्धी मिळेल, असं वाटलंही नव्हतं, सनीचे बाबा सांगतात. बापलेकाची ही जोडी या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने जगभर फि रून आली आहे आणि अजूनही त्यांच्या मागचं चक्र सुटलेलं नाही.

‘लायन’ या चित्रपटात सरू ब्रायरर्ली या मूळ भारतीय असलेल्या पण ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने दत्तक घेतल्यामुळे तिथेच लहानाचा मोठा झालेल्या तरुणाची सत्यकथा आहे. सरू मूळचा मध्य प्रदेशातला.. खांडव्याचा. एकेदिवशी पोटाची खळगी भरण्यासाठी भावाबरोबर निघालेला सरू चुकून एका ट्रेनमध्ये बसतो. ही ट्रेन   त्याला आपल्या घरापासून १६०० किमी दूर असलेल्या कोलकात्यात आणून सोडते. ‘लायन’चा पहिला भाग हा पूर्णत: कोलकात्यात हरवलेल्या सरूचा म्हणजेच पर्यायाने सनीच्या अभिनयाने नटलेला आहे. लहानग्या सरूच्या भूमिके साठी तीन मोठय़ा शहरांमधून तब्बल दोन हजार मुलांच्या ऑडिशन्स घेतल्या होत्या. त्यातून पुन्हा काही जणांची निवड केली आणि खरंच आम्ही खूप आशा लावून बसलो होतो, अशी माहिती या चित्रपटाचे कास्टिंग डिरेक्टर कस्र्टी मॅकग्रेगर यांनी दिली. सनीचा निरागस चेहरा आणि त्याचे बोलके डोळे, त्याचा आवाज या सगळ्यामुळे आम्ही सनीची निवड केली असं या चित्रपटाचे भारतातील कास्टिंग डिरेक्टर टेस जोसेफ यांनी सांगितले. गंमत म्हणजे सनीच्या शाळेत त्या खेळाच्या दिवशी सनीची निवड झाली आणि या चित्रपटाच्या टीमला घेऊनच सनी घरी परतला. त्याने घरी आपल्या वडिलांना चित्रपटासाठी निवड झाल्याचे सांगितले. त्या क्षणी खुद्द दिलीप पवार कामाच्या शोधात फिरत होते आणि काम शोधून थकून भागून घरी परतले होते. मी अनेक छोटी-मोठी कामं करत होतो. सनीने त्या दिवशी मला चित्रपटात निवड झाल्याचं सांगितलं तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. पण जेव्हा चित्रपटाच्या टीमने मला संपर्क केला आणि या सगळ्याविषयी सांगितलं तेव्हा कुठे थोडं थोडं कळत गेलं. पहिल्यांदा माझी यासाठी तयारीच नव्हती पण सनीला चित्रपटात काम करायचंच होतं. म्हणून मग मीही होकार दिला, असं दिलीप सांगतात. त्यानंतर लगेचच दिलीप यांनी दोघांच्याही पारपत्रासाठी अर्ज केले आणि मग ही जोडी ऑस्ट्रेलियाला चित्रीकरणासाठी रवाना झाली.

सरूच्या भूमिकेसाठी टेस आणि त्यांच्या टीमने सनीची जोरदार तयारी करून घेतली होती. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर सनीसाठी खास कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याला एक स्क्रॅपबुक देण्यात आलं होतं ज्यात सरूची गोष्ट, त्याचं बालपण ही सगळी गोष्ट चित्रांच्या मदतीने सांगण्यात आली होती. शिवाय, प्रत्येक नव्या धडय़ाबरोबर नवं चॉकलेटही सनीच्या हातात पडायचं. सनी अजूनही खूप लहान आहे मात्र या कार्यशाळेत चॉकलेटच्या मदतीने सरूची भूमिका शिकणाऱ्या सनीने मला त्या गोष्टीतून सरू समजत होता, त्याचं आयुष्य कळत होतं पण शेवटी मी सनी आहे याची जाणीव व्हायची, असं सांगून आपण कमी नाही हे जाणवून दिलं. याआधी सनी ‘लायन’साठी गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या व्यासपीठावर मुशाफिरी करून आला आहे. त्याने हॉलीवूडच्या टॉक शोमध्येही सहभाग घेतला होता. आता रविवारी तो पुन्हा एकदा टक्सेडो परिधान करून टेचात ‘ऑस्कर’च्या रेड कार्पेटवर जाण्यासाठी तयार असणार आहे. ‘मला अभिनय करायला आवडतं. अजय देवगणचा ‘सिंघम’ हा माझा आवडता चित्रपट आहे’, असं सांगणाऱ्या सनीने आपण आणखी एका ‘लव्ह सोनिया’ नावाच्या चित्रपटातही छोटी भूमिका केली असल्याची माहिती दिली. त्याला आयुष्यभर अभिनय करायला आवडेल, असंही तो विश्वासाने सांगतो. ‘लायन’ला ऑस्कर पुरस्कार मिळाला तर छोटय़ा सनीचा दबदबा वाढेल, यात शंका नाही.