चित्रपटसृष्टींमध्ये मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी) पार पडला. यंदाच्या ऑस्कर विजेत्यांमध्ये अभिनेता महेर्शाला अली हे एक नाव होते. ‘मूनलाइट’ या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेता या विभागात महेर्शाला याला नामांकन मिळाले होते. विशेष म्हणजे त्याला हा पुरस्कार मिळणे अभिप्रेत होते. कारण, तो या पुरस्काराचा योग्य दावेदार होता. महेर्शालाच्या या यशानंतर त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी असलेल्या मलिहा लोधी यांनीही ट्विट करून महेर्शाला यास शुभेच्छा दिल्या. मात्र, तो मुस्लिम नसून अहमदी असल्याचे सांगत मलिहा यांच्यावर ते ट्विट काढून टाकण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
पाकिस्तानी घटनेने अहमदी हे मुस्लिम नसल्याचे जाहीर केलेले आहे. दरम्यान, या वादानंतर मलिहा यांनी सदर ट्विट डिलीट करूनही स्क्रिनशॉटच्या माध्यमातून हा वाद अधिक चिघळला. त्यामुळे केवळ एक शुभेच्छा देणारा संदेश हा वादाचे कारण बनला.

screenshot

यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विभागात महेर्शाला अलीसह जेफ ब्रिजेस (हेल ऑर हाय), लुकास हेज (मँचेस्टर बाय द सी), मिशेल शेनॉन (नॉक्टर्नल अॅनिमल्स), देव पटेल (लायन) यांना नामांकन मिळाले होते. मात्र, यामध्ये ‘मूनलाइट’ चित्रपटासाठी नामांकन मिळालेल्या महेर्शला अलीने बाजी मारली. यानंतर अकॅडमी अवॉर्डमध्ये पुरस्कार पटकाविणारा पहिला मुस्लिम म्हणून महेर्शाला अली ट्रेण्डमध्ये आला होता. ऑस्कर पुरस्कार २०१७ सोहळ्यातील ही पहिली ट्रॉफी गेल्या वर्षीची पुरस्कार विजेती अॅलिसिआ विकॅण्डर हिच्या हस्ते त्याला देण्यात आली होती.