ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्राने दुसऱ्यांदा रेड कार्पेटवर हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याला प्रियांका उपस्थित राहणार हे कळल्यानंतर प्रियांकाच्या लूकबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच प्रियांकाने यावेळीही कार्यक्रमात पांढऱ्या रंगाच्या स्ट्रीपलेस गाउनमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. यावेळी तिने सिल्वर राल्फ आणि रुसो यांनी डिझायन केलेला ड्रेस परिधान केला होता. गतवर्षी झालेल्या सोहळ्यात प्रियांकाने अशाच पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही प्रियांकाने आपल्या संपूर्ण पेहरावाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. प्रियांकाने दुसऱ्यांदा हॉलीवूडमधील या मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्याला हजेरी लावली. गेल्या वर्षी तिच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आले होते. गतवर्षी प्रियांकाने जुहेर मुराद यांनी डिझायन केलेला ड्रेस परिधान केला होता. प्रियांकाच्या या ड्रेसची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. तिच्या ड्रेसची चर्चा एवढी रंगली की चक्क ऑस्करमधील प्रियांकाचा हा ड्रेस गुगल सर्चमध्ये सातव्या क्रमांकाचा ठरला होता. त्यामुळे प्रियांकाच्या यावेळीच्या लूकवरदेखील सर्वांच्या नजरा खिळल्याचे पाहायला मिळाले. रेड कार्पेटवर प्रियांका आगामी चित्रपटातील सहकारी ड्वाइन जॉन्सनसोबत अधिक वेळ घालविताना दिसली. ‘क्वांटिको’ अभिनेत्री प्रियांकाने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर करून ऑस्कर सोहळ्याला हजरी लावणार असल्याचे सांगितले होते. प्रियांका चक्क मिक जॅगरसोबत कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी निघाली होती. तिने टेक ऑफ वेळचा मिकसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. गेल्या वर्षीही, या ‘बेवॉच’मधील अभिनेत्रीने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. अलीकडच्या काळात हॉलिवूडमधील ब-याच पुरस्कार सोहळ्यांना प्रियांकाने हजेरी लावताना दिसली आहे. तिला दोनदा ‘पिपल्स चॉइस पुरस्कारा’नेही गौरविण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ सोहळ्यालाही तिने हजेरी लावली होती. लवकरच ती ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिच्यासह ड्वाइन जॉन्सन (द रॉक), झॅक एफ्रॉन यांच्याही भूमिका आहेत.