नुकत्याच पार पडलेल्या ८९व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये असे बरेच किस्से घडले ज्यांमुळे यंदाचा पुरस्कार सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या आधीच विविध चर्चांना उधाण आले होते. पुरस्कार सोहळ्यासाठीच्या तयारीसंबंधीच्या या चर्चांमधील एक विषय होता तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विषयी कोणते सेलिब्रिटी काय वक्तव्य करणार. एकंदर राजकीय झाक असलेल्या अशा या ऑस्कर सोहळ्याला सात देशांतील मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशावर घातलेल्या बंदीमुळे राजकीय रंग चढला होता.

पुरस्कारावेळी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणाऱ्या जिमी किमेल व इतर ऑस्कर विजेत्या कलाकारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर याच मुद्दय़ाला अनुसरून टीका केल्याचेही पाहायला मिळाले. एका पुरस्कार विजेत्याने त्याचे ऑस्कर स्थलांतरितांना अर्पण केले. लघुपटाचा पुरस्कार स्वीकारणारे निर्माते व दिग्दर्शक एझरा एडलमन यांनी राजकीय हिंसाचार व क्रूरतेचा बळी ठरलेल्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. ऑस्करमध्ये ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत अनेकांच्या बोलण्याचा रोखही त्यांच्याकडेच होता. या सर्व प्रकाराविषयी डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ब्रेइटबर्ट न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

‘ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये माझ्यावरच सर्वांनी निशाणा साधला होता. माझ्यावर टीका करण्यासाठी आणि माझी खिल्ली उडविण्यासाठीच कलाकारांमध्ये स्पर्धा लागली होती. त्याऐवजी जर का त्यांनी पुरस्कार सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले असते तर या सोहळ्यात सावळा गोंधळ झाला नसता’, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.
‘ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये आयोजकांनी राजकारणावरच जास्त लक्ष दिल्यामुळे त्यांना पुरस्कार सोहळ्याकडे पुरेसे लक्ष देता आलेले नाही. त्यामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामधील ग्लॅमरच हरपले’, असेही ट्रम्प म्हणाले. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ विभागातील पुरस्काराची घोषणा करताना काहीसा गोंधळ झाला. सर्वप्रथम ‘ला ला लॅण्ड’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहिर झाला होता. पण, त्यानंतर ‘मूनलाइट’ या चित्रपटाच्या नावे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला. या सर्व गोंधळाच्या परिस्थितीला सूत्रसंचालक जिमी किमेलने सावरुन नेण्याचा प्रयत्न केला खरा. पण, सोशल मीडियावर याविषयीच्या चर्चांनी जोर धरला होता. या सर्व प्रकाराबद्दल ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनीही दिलगिरी व्यक्त केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनीही हाच मुद्दा धरत ऑस्करच्या आयोजनावर टीका केली आहे. त्यासोबतच ट्रम्प यांनी ऑस्करचे वैभव हरवल्याची खंतही व्यक्त केली.