श्रीमंत लोकांनाच अनेक गोष्टी फुकट का मिळतात असा प्रश्न अनेकांना पडतो. पण त्यातही जर तुम्ही ऑस्कर सोहळ्याचे वेडे असाल तर तुम्हाला या गोष्टीचेही आश्चर्य वाटत असेल की ऑस्करमध्ये नामांकन आणि त्यानंतर मानांकन मिळालेल्यांना हजारो डॉलर्सचे गुडी बॅगही मिळतात. ऑस्कर कोणी जिंकला आणि त्या दिवशी कोणी काय घातले याकडे जसे प्रेक्षकांचे लक्ष असते तसेच प्रत्येक वर्षी गुडी बॅगची वाढत जाणारी किंमतही अनेकांचे लक्ष वेधते.

यावर्षी ऑस्करमध्ये नामांकन मिळालेल्यांना न्युझिलंडच्या २,७८,११४ डॉलर्सपेक्षाही जास्त किंमतीचे गुडी बॅग मिळणार आहे. यात हिऱ्यांचाही समावेश आहे, शिवाय हवाई येथे सुट्यांचा आनंद लुटण्याची सोयही ऑस्करवाले करतात. या गुडी बॅगमध्ये सर्वात महागडी गोष्ट म्हणजे नॉर्दन कॅलिफोर्निया येथील लॉस्ट कोस्ट रॅन्च येथे तीन रात्रीं राहायला मिळते. या तीन रात्रींची किंमत जवळपास ३०,५९९ डॉलर्स एवढी आहे.

याशिवाय ६ दिवसांची हवाई ट्रीपही या गुडी बॅगमधून दिली जाते. हवाई येथे कुआयच्या दक्षिण किनारपट्टीवर एका प्रसिद्ध व्हिल्यात राहायला मिळते. या व्हिल्याची किंमत सुमारे १६,८६१ डॉलर एवढी आहे. एवढे कमी की काय अजून तीन दिवसांच्या ट्रीपमध्ये इटली, लेक कोमो येथील ग्रॅण्ड हॉटेल ट्रेमेझो येथे राहायला मिळते.
हे तर झाले फक्त फिरण्याचे, पण सौंदर्यप्रसाधन यांसारखे अनेक भेटवस्तू मिळतात. १० वर्ष ऑक्सिजेनिक्स या कंपनीचे मेकअप- प्रोडक्ट्स दिले जातात. तसेच हायड्रोक्सीकट प्लॅटिनम हे वजन कमी करण्याच्या सप्लिमेन्टच्या गोळ्याही दिल्या जातात. याशिवाय सेलिब्रिटी ट्रेनर अॅलेक्सीस सेलेक्सी यांचे १० सत्र दिली जातात.
याशिवाय २५ डॉलर्सचे डँडी पॅच ही डिओसारखी गोष्टही भेट म्हणून दिली जाते. काखेत येणारा घाम आणि त्यामुळे पडणारे घामाचे डाग हे डँजी पॅचमुळे निघून जातात. रेड कार्पेटवर हे हातात घेऊन फिरु शकतो इतके छोटे असते.

ओमीचे स्मार्ट होम सिस्टिम जे सुमारे ८३० डॉलर्सचे असतात, यांचाही समावेश या गुडी बॅगमध्ये असतो. संपूर्ण घरातील उपकरणांवर फक्त एका बटनने नियंत्रण ठेवणे शक्य आहे. हे उपकरण म्हणजे हेज ड्युअल वॅप्रोरायझर याची किंमत ४३५ डॉलर्स एवढी असते. लिओनार्डो दी कॅप्रिओला हे तंत्रज्ञानवाली भेट जास्त आवडेल यात काही शंका नाही.

याशिवाय ओपल सफरचंदही दिले जातात. असे म्हटले जाते की, ही सफरचंद कापल्यानंतर काळी पडत नाहीत. याशिवाय हृदयविकाराचा झटका आला तर प्रथोमचाराचा किटही दिला जातो. याशिवाय ३८० डॉलर्सचे लक्झरी टॉयलेट पेपर, २७,६६६ डॉलर्सचे खासजी राशीभविष्य सांगणारे यंत्र आणि सोने आणि खडे यांचे मिश्रण असलेले १८६ डॉलर्सचे हँड सॅनिटायझरही दिले जाते.