कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत ऑस्कर मिळवण्याकरता चढाओढ लागलेली असते. हीच चढाओढ आणि कलाकारांची मांदियाळी यंदाच्या वर्षीही पाहायला मिळणार आहे. रेड कार्पेटची शान आणि सोबत पुरस्कार विजेत्यांनी केलेले भावना व्यक्त करणारे भाषण या सर्वांकडे प्रेक्षकांच्याही नजरा लागलेल्या असतात. चला तर मग, चित्रपट जगतातील सर्वोच्च स्थानी असलेल्या ऑस्कर २०१७ पुरस्कार सोहळ्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया….

ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा कधी आहे?

अमेरिकी प्रमाणवेळेनुसार ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी होईल.

ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार किती वाजता बघता येईल?

भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी, २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजता हा पुरस्कार सोहळा सुरु होईल.

ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा कुठे होतो?

कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा होईल. ‘अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅण्ड सायन्स’ हे विविध २४ विभागांमध्ये देण्यात येणा-या या पुरस्कारांचे वितरक आहेत

ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा कुठल्या वाहिनीवर लाइव्ह बघता येईल?

स्टार मुव्हीज आणि स्टार मुव्हीज सिलेक्ट एचडी या वाहिन्यांवर तुम्हाला हा पुरस्कार सोहळा लाइव्ह पाहता येईल.

ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन कोण करणार?

जगभरातील कलाकारांच्या नजरा लागून राहिलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन यंदा सुप्रसिद्ध टेलिव्हीजन अँकर जिमी किम्मेल करेल. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची जिमीची ही पहिलीच वेळ आहे.

ऑस्कर पुस्कार कोणाच्या हस्ते दिला जाणार?

लिओनार्डो दीकॅप्रिओ, अॅमी अॅडम्स, सॅम्युअल एल जॅक्सन, स्कार्लेट जॉन्सन, ड्वाइन जॉन्सन, ब्री लार्सन, हॅले बेरी, जॅमी डोर्नन, डकोटा जॉन्सन, एमा स्टोन, चार्लीझ थेरॉन यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या हस्ते ऑस्कर पुरस्काराचे वितरण केले जाईल.

ऑस्करसाठी यंदा कोणत्या भारतीय कलाकारांना नामांकन मिळाले आहे का?

मल्याळम दिग्दर्शक जयराज नायर यांचा ‘वीरम’ आणि तामिळ चित्रपट ‘विसरनाई’ हेदेखील ऑस्करच्या स्पर्धेत होते. मात्र, ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकन यादीत स्थान मिळवण्यास हे चित्रपट अयशस्वी ठरले. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने या चित्रपटांची ८९ व्या ऑस्कर स्पर्धेतील प्रतिनिधित्वासाठी निवड केली होती. भारताला परदेशी भाषेतील चित्रपट गटात कधीच ऑस्कर मिळालेले नाही. अलिकडच्या काळात एकच चित्रपट शेवटच्या पाचात पोहोचला होता, त्यात आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’चा समावेश होता. दरम्यान, भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल याला ‘लायन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या विभागात नामांकन मिळाले आहे.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याचे वैशिष्टय काय?

यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘लाला लँड’ या चित्रपटाला एक, दोन नव्हे तर तब्बल १४ विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे. त्याआधी हा पराक्रम १९६९ साली ‘ऑल अबाउट इव्ह’ आणि १९९७ साली ‘टायटॅनिक’ या चित्रपटांनी केला होता.