अमेरिकेत रंगलेल्या ऑस्कर या प्रतिष्ठीत पुरस्कार सोहळ्यावर जगभराच्या नजरा खिळलेल्या असतात. या पुरस्कार सोहळ्यात भारतीयांच्या नजरा लागून होत्या त्या म्हणजे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची कार्यक्रमाला असणारी उपस्थिती आणि दुसरी म्हणजे भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल याचे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या विभागात झालेले नामांकन.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रियांका चोप्राने रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवत हम भी किसी से कम नही हेच दाखवून दिले. प्रियांकानंतर, सहाय्यक अभिनेता या गटामधून नामांकन मिळवलेल्या देव पटेलला या वर्षी ऑस्करची ती बाहूली मिळणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र देव पटेलची जादू ‘मूनलाइट’ चित्रपटातील अभिनेता ‘महेरशाला अली’ समोर फिकी पडली आणि त्याने ८९ व्या ऑस्कर पुरस्कारावर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून बाजी मारली.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या गटात जेफ ब्रिजेस (हेल ऑर हाय वॉटर), लुकास हेज (मँचेस्टर बाय द सी), देव पटेल (लायन), मिशेल शेनॉन (नोकटर्नल अॅनिमर्ल्स) हे इतर चार स्पर्धक होते. चारही स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत होती. यातील प्रत्येक कलाकाराने आपली कलाकृती सादर करताना त्यात अक्षरश: जीव ओतला आणि सिनेमातील व्यक्तिरेखा जिवंत केली. पण ‘मूनलाइट’ चित्रपटातील महेरशाला अलीने साकारलेली भूमिका काहीशी उजवी ठरली आणि २०१६ मधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून त्याने पुरस्कारावर नाव कोरले.

महेरशाला अली चित्रपटात सहाय्यक अभिनेता जरी असला तरीदेखील त्यातील मुख्य पात्रांवर वरचढ ठरणारा अभिनय त्याने केला आहे. संपूर्ण चित्रपट त्याच्याच भोवती फिरावा इतका तो भूमिकेशी एकरुप झालेला दिसतो. एक अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द फार मोठी नसली तरी कोणत्याही पूर्वग्रहाला बळी न पडता अभिनयावरची त्याची पकड, भूमिकेचा अभ्यास, चित्रपटातील त्याच्या बारीकसारीक हालचाली या वाखाण्याजोग्या आहेत. चित्रपटाच्या आशयात जेवढा साधेपणा आहे तेवढाच साधेपणा आणि सच्चेपणा त्याच्या सादरीकरणातही दिसून येतो. थोडक्यात काय तर उत्कृष्ट अभिनयाचे सुरेख प्रदर्शन महेरशाला अलीने केले आहे. म्हणूनच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या पुरस्काराचा तो मानकरी ठरला.

‘मूनलाइट’ चित्रपटाचे दिग्दर्शन बॅरी जेन्कीन्स यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा एका निग्रो मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. मायामी शहरातील हिंसाचारी भागात राहणारा मुलगा लहानाचा मोठा होत असताना आजूबाजूच्या परिस्थितीचा त्याच्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि त्यातून होणाऱ्या घडामोडींचे चित्रिकरण या चित्रपटात केले आहे. वर्णभेदाच्या पलीकडे जाऊन हा सिनेमा खूप काही सांगणारा आहे.