अभिनेता रणवीर सिंग त्याच्या मनमोकळ्या स्वभावासाठी नेहमीच ओळखला असतो. चित्रपटातील त्याच्या अभिनयासोबतच कलाविश्वामध्ये सहकारी कलाकारांसोबत असणारे रणवीरचे मैत्रीचे नाते नेहमीच चर्चेत असते. असा हा हरहुन्नरी कलाकार एक चांगला रॅपरही आहे. शब्दांची जुळवाजुळव आणि त्याला वेगळीच चाल देत रॅप करणाऱ्या रणवीरची झलकही आपण याआधी बऱ्याच कार्यक्रमांतून पाहिली असेल. सध्या हा ‘बेफिक्रा’ अभिनेता पुन्हा एकदा रॅपरच्या अवतारात सर्वांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जातेय.

रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोकडे पाहून तरी निदान असेच वाटत आहे. आगामी ‘गली बॉय’ या चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने रणवीर अनुष्का मनचंदासोबत एक रॅप साँग गाणार असून, या चित्रपटातही तो एका रॅपरचीच भूमिका साकारणार आहे. त्याच्या आगामी ‘गली बॉय’ चित्रपटाचे कथानक हे कुर्ला परिसरातील झोपडपट्टीमधील नावेद शेख नावाच्या एका रॅपरच्या जीवनावर आधारित आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्ट रणवीरसोबत या आगामी चित्रपटात स्क्रिन शेअर करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे सध्या ‘मेक माय ट्रीप’च्या जाहिरातीतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही धमाल जोडी चित्रपटातूनही पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये ‘गली बॉय’बद्दल उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

झोया अख्तर ‘गली बॉय’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, तिच्या दिग्दर्शनात काम करण्याची रणवीरची ही दुसरी वेळ आहे. याआधी त्याने झोया अख्तर दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात काम केले होते. दरम्यान सध्या रणवीर सिंग संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रिकरणावर जास्त लक्ष केंद्रित करत असून, या चित्रपटात तो अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील रणवीरसह इतर सर्व कलाकारांच्या भूमिकांविषयी आणि त्यांच्या लूकविषयी सध्या कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.