‘पद्मावती’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना जयपूरपासून ते कोल्हापूपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सहकाऱ्यांना लोकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले आहे. चित्रीकरणस्थळी येऊन मारहाण करण्यापासून ते सेट जाळण्यापर्यंत अनेक वाईट अनुभवातून सध्या भन्साळी जात असून चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी याविरोधात वेगवेगळ्या माध्यमांतून असंतोष व्यक्त केला आहे. मात्र, खुद्द भन्साळी यांनी या प्रकरणावर काही न बोलणे पसंत केले होते. अखेर, आपला चित्रपट हा महाराणी पद्मावतीसारख्या शूर राजपूत वीरांगनेने दिलेल्या धारदार लढय़ाची कहाणी आहे, असे सांगत भन्साळी या प्रकरणी बोलते झाले आहेत.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटात राणी पद्मावती आणि अल्लाऊद्दीन खिलजी यांच्यात प्रेमसंबंध दाखवण्यात येणार असल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. मात्र असे काहीही आपल्या चित्रपटात दाखवण्यात येणार नसल्याचे वारंवार स्पष्ट करूनही आपल्याला विनाकारण अशा प्रकारच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे, अशी खंत भन्साळी यांनी व्यक्त केली आहे. माझ्या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात चुकीच्या कल्पना आहेत. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी हा चित्रपट बनवण्याआधी महाराणी पद्मावती यांच्याबद्दल उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती, संदर्भ गोळा केले आहेत. माझ्या पटकथेत कुठेही पद्मावती आणि खिलजी यांच्यात प्रणय प्रसंग रंगवण्यात आलेला नाही किंवा त्यांच्यात प्रेम दाखवणारे कुठलेही काल्पनिक गाणेही चित्रपटात नाही, असे भन्साळी यांनी स्पष्ट केले.

एक सर्जनशील दिग्दर्शक म्हणून माझा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास आहे. मात्र अभिव्यक्तिस्वातंत्र्य घेत असताना त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव, त्याचे भानही मला आहे. या चित्रपटातून कुठल्याही समुदायाच्या भावनांना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नाही, असे सांगत चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा संपूर्ण मेवाडला या चित्रपटाबद्दल गर्व वाटेल, असा विश्वासही भन्साळी यांनी व्यक्त केला.