नेहमी वादाच्या भोव-यात सापडणारे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी चित्रपट लीक होण्यामागचे रहस्य उलगडले आहे. चित्रपट लीक होण्यामागे सेन्सॉर बोर्ड नसून चित्रपटांचे दलाल जबाबदार असल्याचे स्पष्ट मत निहलानी यांनी मांडलं.
काही दिवसांपूर्वीची अनुराग कश्यपचा  ‘उड़ता पंजाब’ आणि इंदर कुमारचा ‘ ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ या चित्रपटांसह अन्य काही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लीक झाले होते. त्यावरून बॉलीवूडमध्ये बरीच खळबळ माजली होती. हे चित्रपट लीक होण्याचा आरोप सेन्सॉर बोर्डावर लावला जात होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सदर वृत्ताचे खंडन केले होते. याविषयी ते म्हणालेले की, सेन्सॉर करण्यासाठी बोर्डाला जी डीव्हीडी दिले जाते त्यावर ‘सेन्सॉर कॉपी’ असा वॉटरमार्क असतो तो आम्हाला चित्रपटकर्त्यांच्या स्टुडिओतूनच दिला जातो. ज्या दलालाने किंवा अर्जदाराने आमच्याकडे चित्रपटाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला असतो तो ती डीव्हीडी आमच्याकडे घेऊन येतो. त्यानंतर आम्ही सदर डीव्हीडी चित्रपटगृहात पाहतो. हे चित्रपटगृह सेन्सॉर बोर्डाचे नसते. त्यामुळे ही जबाबदारी आमची नसून त्या दलालाची किंवा अर्जदाराची आहे.
सेन्सॉर बोर्ड आपल्या पद्धतीने काम करत आलेय आणि करत राहिल, असे निहलानी यांचे म्हणणे आहे. पूर्वी लाच देऊन काम करुन घेतले जायचे पण आता लाच घेणं बंद झाल्याने लोक विविध विविध पद्धतीने विरोध करण्यासाठी पुढे येत आहेत. मध्यंतरी चित्रपट लीक होण्यामागचे प्रमाण बरेच वाढले होते. त्याचा पूर्ण फटका चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कमाईवर झाला होता. ‘बाजीराव-मस्तानी’, ‘राज रिबूट’, ‘कबाली’, ‘सैराट’, ‘पार्श’, ‘ ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ यांसारख्या अनेक चित्रपटांना थोड्या फार प्रमाणात का होईना, पण फटका बसला.