मूळची पाकिस्तानची असलेली प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सलमा आगाने परदेशस्थ भारतीय नागरिकत्व (ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया) बहाल करण्यासाठी भारत सरकारकडे अर्ज केला आहे. तिचा अर्ज गृह मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. ओसीआय कार्डधारकास आजीवन भारत देशात कितीहीवेळा येण्या-जाण्यास सूट प्राप्त होत असून, पोलिसांना सूचित न करण्यासारख्या सुविधा प्राप्त होतात. गृह मंत्रालय सलमा आगाच्या अर्जावर विचार करत असून, याबाबत लवकरत निर्णय घेण्यात येणार असल्याचे गृह मंत्रालयातील सुत्रांनी संगितले. ब्रिटनची नागरिक असलेल्या सलमा आगाचा जन्म पाकिस्तानात झाला होता.
१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निकाह’ या प्रसिद्ध चित्रपटात तिने अभिनय केला असून, याच चित्रपटातील ‘दिल के आरमां आंसुओं में बह गए’ गाण्यासाठी तिला १९८२ सालचा उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. नियमानुसार, ज्यांचे पालक, आजी-आजोबा आणि पूर्वज वर्तमानात अथवा भूतकाळात पाकिस्तान किंवा बांगलादेशचे नागरिक असल्यास अशा व्यक्ती ‘परदेशस्थ भारतीय नागरिकत्व’ बहाल करण्यास अपात्र ठरतात. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात मूळचा पाकिस्तानी असलेला गायक अदनान सामीला ‘परदेशस्थ भारतीय नागरिकत्व’ बहाल करण्यात आले होते.