एकेकाळी गाजलेल्या पाकिजा चित्रपटाची त्या पिढीतील अनेकांनी पारायणे केली होती. या चित्रपटातून विशेष ओळख मिळालेल्या गीता कपूर या ज्येष्ठ अभिनेत्रीला वृद्धापकाळात अतिशय वाईट परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. एकेकाळी मोठा पडदा गाजविलेली ही अभिनेत्री अशाप्रकारे एकटी पडल्याचे चित्र आहे.

वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर गीता कपूर यांचा मुलगा राजा त्यांना तिथेच सोडून निघून गेला आहे. त्यामुळे त्यांचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहीला आहे. मात्र त्याचवेळी निर्माते रमेश तौरानी यांनी या अभिनेत्रीसाठी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे.

गीता कपूर यांना २१ एप्रिल रोजी कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने गोरेगावमधील एसआरव्ही हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा राजा याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर तो रुग्णालयातून निघून गेला आणि पुन्हा आलाच नाही.

गीता यांच्यावरील उपचार पूर्ण झाले असून त्यांना घरी नेण्यासाठी रुग्णालय प्रशासन राजा कपूर आणि गीता यांची मुलगी पूजा यांना मागील एक महिन्यापासून संपर्क करत आहेत. याशिवाय गीता यांच्या उपचाराचे बील जवळपास दिड लाख रुपये झाले असून याबाबत माहिती देण्यासाठी राजा आणि पूजा यांना अनेकदा संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

गीता यांच्या सांगण्यानुसार, राजा त्यांना मागील काही दिवसांपासून त्रास देत होता. आपण वृद्धाश्रमात जाण्यास तयार नसल्याने त्याने आपल्याला ३ ते ४ दिवस काहीही खायला न देता दवाखान्यात नेण्याचा बहाणा केला. आणि अशापद्धतीने इथे सोडून दिले असा आरोप त्यांनी केला आहे.

एकिकडे गीता यांचे कुटुंब त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असताना निर्माते रमेश तौरानी यांनी पुढे येत रुग्णालयाचे बील भरले आहे. त्यामुळे गीता यांना डिसचार्ज मिळाला असल्याचेही रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र आता गीता यांची केस पोलिसांकडे गेली असून त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याबाबत पोलिस निर्णय घेतील असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.