पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड स्टार रणबीर कपूर यांच्यातील मैत्रीमुळे गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये माहिरा आणि रणबीर एकत्र वेळ व्यतीत करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोघांमध्येही काहीतरी नातं असल्याचे तर्क अनेकांनी लावले. त्यातही हे दोघंही धुम्रपान करताना दिसल्यामुळे अनेकांनी माहिराच्या चरित्र्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं.

तोकडा ड्रेस घातल्यामुळे आणि महिला असून धुम्रपान केल्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठवण्यात आली होती. या सर्व प्रकरणानंतर रणबीरने त्यांचं मत मांडत माहिराची पाठराखण केली होती. पण, माहिराने मात्र या सर्व प्रकरणी मौन पाळण्यास प्राधान्य दिलं. ती या प्रकरणी काय प्रतिक्रिया देणार याची अनेकांनाच प्रतीक्षा लागून राहिली असतानाच आता माहिराने आता आपलं मौन सोडलं आहे. ‘वर्ना’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात माहिराला ‘त्या’ व्हायरल फोटोंविषयी प्रश्न आला. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देत माहिरा म्हणाली, ‘त्याविषयी फार काही बोलण्यासारखं नसून, ती एक खासगी बाब होती.’ आपण, त्या प्रसंगातून खूप काही शिकल्याचंही तिने यावेळी स्पष्ट केलं.

वाचा : ‘शोले’मध्ये ठाकूरची भूमिका साकारणार होते धर्मेंद्र, पण…

https://www.instagram.com/p/BaW_DCYA9cv/

‘सहसा मी गोष्टी काळजीपूर्वक हाताळते. मी ते (धुम्रपान) चित्रपटांमध्ये करत नाही. त्याकरता मी स्पष्टपणे नकार देते. कोणतीही गोष्ट जगाला दाखवण्यासाठी का केली जावी?’, असा प्रतिप्रश्न तिने उपस्थित केला. याबाबतच ‘समा टीव्ही’शी संवाद साधताना माहिरा म्हणाली, ‘हे माझं खासगी आयुष्य असून, मुलाने आणि मुलीने एकत्र फिरणं ही अतिसामान्य बाब आहे. हल्ली प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी फक्त कार्यक्रमांनाच उपस्थित असतात असं नाही.’ माहिराच्या या वक्तव्यावरुन माध्यमांमध्ये या प्रकरणाला ज्या प्रकारे हवा मिळाली ते तिला रुचलं नसल्याचंही स्पष्ट होत आहे.