भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात २९ सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईदरम्यान भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील सात दहशतवादी तळ नेस्तनाभूत केले होते. भारतात जम्मू काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील त्यांच्या भाषणाद्वारे उरीमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकची कारवाई झाली आणि दोन देशांमधील तणावाच्या वातावरणाला आणखीनच खतपाणी घातले गेले.

सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर सर्वसामान्यांपर्यंत ही कारवाई नक्की असते तरी काय हे सांगणारे आणि त्याबद्दलची माहिती देणारे विविध व्हिडिओ आणि माहितीपत्रे प्रसारमाध्यामांद्वारे प्रसिद्ध करण्यात आली. पण अभिनेत्री पल्लवी जोशीच्या एका व्हिडिओने या कारवाईला अगदी वेगळ्या आणि सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचवले आहे. सोशल मीडियावर पल्लवीचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नेमके काय?, त्याचे परिणाम काय असतात? अशा विविध प्रश्नांची उत्तरे पल्लवीच्या ‘सर्जिकल स्ट्राईक मेड सिंपल’ या व्हिडिओद्वारे मिळत आहेत. पल्लवीचा हा व्हिडिओ सध्या गाजत असण्याचे एक कारण म्हणजे क्रिकेटच्या उदाहरणाची मदत घेत आणि भारत-पाकिस्तानदरम्यानचा काल्पनिक सामन रंगवत तिने सर्जिकल स्ट्राईकचा अर्थ अधिक सोपा करुन सांगितला आहे. पल्लवीने ही कारवाई अधिक सोपी करुन सांगण्यासाठी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, शोएब अख्तर यांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नक्की काय रे भाऊ? असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर, हा व्हिडिओ एकदा पाहाच.