नावातच वेगळेपणा असणा-या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’ म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडला आहे. येत्या १४ नोव्हेंबरला म्हणजेच बालदिनी यामागचे रहस्य उलगणार आहे. पण त्यापूर्वी हा चित्रपट बनवतानाचा आपला अनुभव दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितला.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा हिट चित्रपट देणारे परेश म्हणाले की, गेली कित्येक शतकं महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी साज-या केल्या जात आहेत. मग मी तिसरी एकादशी निर्माण करण्याचा विचार केला आणि ती स्वतःलाच भेट स्वरुपात दिली. मी आणि माझी पत्नी मधुगंधा हिने चित्रपटाची संपूर्ण संकल्पना तयार केली. त्यानंतर, गेल्याच वर्षी आम्ही कार्तिकी वारीत या संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण केले. या चित्रपटाचे वैशिष्य म्हणजे त्यात आलेल्या अडचणी आहेत. खरंतर त्या गंमतशीर अडचणी आहेत. चित्रपटाचे प्रमुख कलाकार ही त्यातील मुल आहेत. आपल्याकडे चांगली मुलं मिळणं आणि त्यांच्यासोबत काम करणं ही कठीण गोष्ट आहे. दुसरी अडचण म्हणजे या मुलांसोबत पंढरपूरला जाऊन कार्तिकी वारीमध्ये चित्रीकरण करण होत. अशा मजेशीर अडचणींतून ‘एलिझाबेथ एकादशी’ तुमच्या भेटीला येत आहे, असे परेश म्हणाले.
श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, नंदिता धुरी, वनमाला किणीकर,पुष्कर लोणारकर, चैतन्य बडवे, दुर्गेश बडवे महाजन, चैतन्य कुलकर्णी, अश्विनी भालेकर यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.