बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबी यांच्या मृत्यूनंतर जवळपास तब्बल ११ वर्षांनंतर त्यांच्या संपत्तीच्या वादावर पडदा पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने परवीन बाबी यांच्या संपत्तीतील ८०  टक्के वाटा गरजू महिला आणि मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार असल्याचे सांगितले.
एकेकाळी बॉलीवूड गाजवणा-या अभिनेत्री परवीन बाबी यांचा २००५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या ११ वर्षांपासून त्यांच्या संपत्तीचा वाद न्यायालयामध्ये सुरू होता. परवीन यांच्या काकांनी संपत्तीच्या वाट्याकरिता त्यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने आता त्यांच्या मृत्यूपत्राला मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांच्या संपत्तीतील ८०  टक्के वाटा गरजू महिला आणि मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार असून त्यांच्या मामांना उर्वरित संपत्तीचा २० टक्के भाग मिळणार आहे. परवीन यांचे  मृत्यूपत्र त्यांच्या मामांनी २००५ मध्ये न्यायालयाकडे सुपूर्द केले होते. पण त्यांच्या वडिलांकडील नातेवाईकांनी हे मृत्यूपत्र बनावट असल्याचा न्यायालयामध्ये दावा केला होता. परवीन बाबी यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिले होते की, त्यांच्या संपत्तीतील २०  टक्के वाटा त्यांच्या मामांना देण्यात यावा. त्‍यानुसार त्यांच्या संपत्‍तीतील २० टक्‍के वाटा परवीन यांच्या मामांना तर ८० टक्‍के संपत्‍ती गरजू महिला आणि मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.
परवीन बाबी यांच्या संपत्तीमध्ये त्यांचे घर, जुहू येथील चार बेडरुमचा फ्लॅट, जुनागड येथील हवेली, दागिने, बँकेत ठेवण्यात आलेली २० लाखांची मुदत ठेव रक्कम आणि अन्य काही मिळकतीचा समावेश आहे. २२ जानेवारी २००५ रोजी परवीन या जुहू स्थित फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या.