‘है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ….. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ’, हे गाणं वाजू लागताच एक चेहरा डोळ्यांसमोर येतो. तो चेहरा म्हणजे अभिनेता मनोज कुमार यांचा. भारत कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याच्या कारकिर्दीत आजवर बरेच चढ- उतार आले. पण, त्यावर मात करत आणि चित्रपटसृष्टीला मोलाचं योगदान देत त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं. सध्याच्या घडीला मनोज कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते असून त्यांच्या कारकिर्दीचा बऱ्याच कलाकारांनी आदर्श घेतला आहे.

हरिकृष्ण गिरी गोस्वामी हे मनोज कुमार यांचं खरं नाव. पण, इतर अभिनेत्यांप्रमाणेच त्यांनीही एका वेगळ्या नावाने या कलाविश्वात प्रसिद्धी मिळवली. त्यांनी नेमकं आपलं खरं नाव का बदललं असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? यामागे एक सुरेख किस्सा आहे. मनोज कुमार यांच्या बालपणीचा हा किस्सा आहे. शालेय दिवसांमध्ये मनोज कुमार ‘शबनम’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. या चित्रपटात अभिनेते दिलीप कुमार यांनी मुख्य भूमिका साकारली होती. दिलीप कुमार यांच्या त्या भूमिकेने हरिकृष्ण इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वत:चं नाव बदललं आणि ‘मनोज कुमार’ या नावाचा स्वीकार केला.

मनोज कुमार यांच्या भूमिका पाहिल्या तर, त्या काळच्या अभिनेत्यांच्या भूमिकांपेक्षा त्या वेगळ्या होत्या. एकीकडे रोमॅण्टिक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच मनोज यांनी देशभक्तीपर चित्रपटांना प्राधान्य दिलं. त्यांच्या याच कृतीमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला ‘भारत कुमार’.

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

अभिनयासोबतच चित्रपट निर्मिती- दिग्दर्शनातही त्यांना रस होता. देशभक्तीपर चित्रपटातून अभिनय करत आणि अशा चित्रपटांचं दिग्दर्शन करत नफा मिळवण्याचे नवे निकष आखून दिले. विविध कलाकारांच्या करिअरला हातभार लावण्यामध्येसुद्धा मनोज कुमार यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. इतकंच काय, तर अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील अडचणीच्या दिवसांमध्ये मनोज कुमार यांनी त्यांना ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटात संधी दिली होती. त्यांच्या याच कृतीमुळे मनोज कुमार यांना चित्रपटसृष्टीत आदराचं स्थान आहे.