एखादा विषय टेलीव्हिजनच्या पडद्यावर हिट व्हायलाच हवा किंवा प्रेक्षकांना कुठला विषय आवडतो तेच देणारी मालिका करायची यापेक्षाही एखादा नविनच विषय सद्यस्थितीत प्रेक्षकांना कितरत रुचेल याची चाचपणी करत तो मांडण्याचा धोका पत्करणाऱ्या निर्माता-दिग्दर्शकांची टक्केवारी छोटय़ा पडद्यावर वाढते आहे. सोनी टीव्हीवर १७ जूलैपासून सुरू होणारी ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अशाचप्रकारातील असून सध्या त्याचे प्रोमोज लक्ष वेधून घेत आहेत.

एका तरूणीचे लहान मुलाशी होणारे लग्न आणि त्यांच्यात परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या या नात्यातील रहस्य हा या मालिकेचा विषय आहे. आपल्याक डे पूर्वी मोठय़ा वयाच्या पुरूषाचे लहान मुलीशी होणारे विवाह परिचयाचे होते. मात्र एका तरूणीचे लहान मुलाशी लग्न लावण्यामागचे काय कारण?, हा विषय प्रेक्षकांसाठी पूर्णत: नविन आहे. या विषयाशी प्रेक्षक जोडले जातील का?, ही कथा त्यांना कितपत पटेल, हे एक आव्हानच होतं, असं या मालिकेचे निर्माते सुमित मित्तल सांगतात. मात्र आपण जेव्हा नव्याने असा काही कथाविषय आणतो तेव्हा त्याला सुरूवातीपासूनच त्या नवेपणाचा फायदा मिळतो. मग ती कथा जुनी झाली तरी नावासकट त्यांचा ठसा प्रेक्षकांवर कायम राहतो. परंतु ते नवंपण टिकवणं हे मोठं आव्हान आहे आणि ते कास्टिंग, सेट, त्यांच्या वेशभूषा या सगळ्यांभोवती फिरत असतं. त्यामुळे जी गोष्ट मनासारखी हवी आहे ती मिळताना अडथळे निर्माण होतात, असं त्यांनी सांगितल. ‘पहरेदार पिया की’ मालिकेचा लुक पूर्णपणे वेगळा आणि श्रीमंत असा आहे मात्र ती पिरिअड मालिका नाही. त्यामुळे आम्हाला कास्टिंग व त्यांचा लुक करताना खूप अडथळे आले. शाही घराणं दाखवण्यासाठी आम्ही आमच्या ओळखीतल्या एका रॉयल फॅमिलीला आमची कथा सांगितल्यावर त्यांनी सगळ्या बाजूने आम्हाला मदत केली. त्यामुळे वर्षांनुवर्ष शाही आयुष्य जगलेल्या या घराण्यातून व्यक्तिरेखेची तिच्या पोशाखापासून ते संपूर्ण सेटभर आम्हाला जे हवं होतं ते सर्व हळूवार मिळत गेलं. हा मालिकेला आणि व्यक्तिरेखांना जो नवा लुक दिला आहे तेच आमचं नवंपण आहे, असं मित्तल ठामपणे सांगतात.

पण मालिकेच्या लुकमधला नवंपण आणि कथेचा विषय यांची सांगड कशी घालणार?, या प्रश्नावर मालिकेची नायिका दियाचा विवाह रतन या लहान मुलाशी होत असला तरी तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, विचार आहेत आणि स्वत:चा हरएक निर्णय घेण्याचा अधिकारही तिला आहे. त्यामुळे साहजिकच ही तिच्या त्यागाची नाही तर एक निर्भिड व्यक्तिमत्वाच्या स्त्रीची वेगळी गोष्ट असेल हे तुम्हाला प्रोमोजमधूनही जाणवेल, असं ते म्हणतात.     या मालिकेत राजस्थानमधील ‘हर्षवर्धन ग्रुप ऑफ हेरिटेज हॉटेल्स’चा वारस छोटा रतन सिंग नेहमी धमक्यांच्या धोक्याखाली वावरतो आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याच्यापेक्षा मोठय़ा मुलीशी त्याचा विवाह करून दिला जातो. रतनशी विवाह केल्यानंतर दिया ही त्याची पहरेदार म्हणून सावलीसारखी वावरते. एकूणच या मालिके च्या कथेला राजस्थानची पाश्र्वभूमी असल्याने तिथली राजेशाही पद्धती, राजमहाल, तिथली संस्कृती असा भव्यदिव्य मामला यात आहे.

या मालिकेत मराठी नाटय़-सिने अभिनेत्री अदिती देशपांडे यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांची ही पहिलीच हिंदी मालिका आहे. हिंदीतही असे वेगवेगळे विषय येत असल्याने मराठी कलाकारांचा तिथे ओढा जास्त आहे. मालिकेची निर्मितीमूल्य, दर्जेदार कथा यामुळे अशा मालिकेत काम करायला मिळणं भाग्याचंच आहे असं अदितीचं म्हणणं आहे. कुठलीही नविन व्यक्तिरेखा साकारण्यासाठी लागणारी मेहनत आणि ते करताना मिळणारा अनुभव हा प्रत्येक कलाकारासाठी महत्वाचा असतो. स्वत:ला पूर्णपणे मुरलेली व राजस्थानी व्यक्ती बनवणं हे माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं. त्यात कु ठेही मराठीचा उच्चार मला माझ्या हिंदी संवादांच्या आड येऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे हे वेगळेपण  नेहमीच्या माझ्या सोजवळ भूमिकांमध्ये मला जास्त भावलं असं त्या म्हणतात. या मालिकेत त्यांनी छोटय़ा ठकुराईनची भूमिका केली आहे.

राजस्थानी व्यक्तिरेखा साकारताना साहजिकच मनावर दडपण होतेच. मात्र ते प्रेक्षकांना न दाखवता सगळ्यांना समजून घेणारी ही वेगळी व्यक्तिरेखा साकारताना खूप आनंद वाटला, असंही त्या म्हणाल्या. त्यांच्याबरोबर या मालिकेत परमीत सेठी, किशोरी शहाणे, जितेन लालवानी, गिरीश सचदेव, मनिषा सक्सेना, अंजली गुप्ता या लोकप्रिय टेलिव्हिजन कलाकारांचा समावेश आहे.

दियाचा राजेशाही लुक साकारताना..

दियाला जितकं सुंदर बनवता येईल तितकं सुंदर बनवण्याचा प्रयत्न या मालिकेत केला आहे. आम्ही कोणतंही फॅब्रिक बाजारातून विकत न आणता ते खास राजस्थानी कारागीरांकडून तयार करून घेतलं आहे. दियाचे दागिनेही कुंदनने बनवले असून त्यावर खऱ्या २४ कॅरेट सोन्याचे पाणी चढवले आहे. रतनचा लुक पुर्णपणे राजपूत वाटावा म्हणून शेरवानी, ब्रिजेश पँन्टस् त्याला देण्यात आल्या आहेत. दियाने या मालिकेत लाख व कुं दनपासून बनवलेले चोकर घातले आहेत हे सध्याच्या फॅशनमध्ये नक्कीच लोकप्रिय होतील कारण लाखेपासून बनवलेले दागिने हे बाजारात उपलब्ध नाहीत परंतु, कुंदन आणि लाख दोन्हीचा वापर करून केलेले हे दियाचे दागिने यापुढे नववधूंच्या पेहरावात मानाचे स्थान मिळवतील यात शंका नाही.

– शीतल पटेल, वेशभूषाकार , मराठी नाटक