सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून भारतीय टेलिव्हिजन आणि रेडिओ चॅनेल्सवर पूर्णपणए बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय प्रसारण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. उद्यापासून ही बंदी लागू होणार आहे. यापूर्वी ‘एम. एस. धोनी- द अनटोन्ड स्टोरी’ या चित्रपटावरही पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तेढ आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा फटका दोन्ही देशांतील कलाक्षेत्राला बसताना दिसत आहे. ‘पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हुसकावून लावू’ असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर सीमेपल्याड या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली होती. त्यातच ‘इम्पा’ने घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. भारताचा हा पवित्रा पाहता पाकिस्तानमध्येही ‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटी’ म्हणजेच ‘पर्मा’च्या निर्णयानुसार भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

२१ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजल्यापासून भारतीय टेलिव्हिजन वाहिन्या आणि रेडिओ सेवेवर बंदी घालण्यात येणार आहे. हा इशारा देऊनही जे वितरक भारतीय वाहिन्यांचे प्रसारण सुरुच ठेवेल त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही पर्मातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील ‘केबल ऑपरेटर्स’ना भारतीय वाहिन्या प्रसारित न करण्याची ताकीद देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान ही तणावग्रस्त परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत पाकिस्तानमधील काही चित्रटगृहांच्या मालकांनीदेखील भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तामध्ये ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती.