काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘फिल्लौरी’ चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडताना दिसत आहे. दिलजित दोसांज, अनुष्का शर्मा, सूरज शर्मा आणि मेहरीन पिरजादा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत ९.२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटातील गाणी आणि कथानक या सर्वांसोबतच चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षक दाद देत आहेत. विशेष म्हणजे अनुष्का शर्माचा चित्रपटात सहभाग असूनही दिलजित दोसांज आणि सूरज शर्मा यांच्या भूमिका लक्षवेधी ठरत आहेत. ‘फिल्लौरी’ला मिळालेले यश आणि आपल्या भूमिकेला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम पाहता अभिनेता दिलजित दोसांजने एक फेसबुक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांचे आणि संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीचे आभार मानले आहेत. त्यासोबतच झालेल्या चुकांबद्दल त्याने सर्वांनी माफीही मागितली आहे.

‘हिंदी चित्रपटसृष्टीबद्दलची कृतज्ञता मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. या चित्रपटसृष्टीने आजवर अनेक कलाकारांना, सुपरस्टार्सना जन्म दिला, अनेकांची स्वप्न पूर्ण केली आहेत. विविध संस्कृतींचे आणि भावभावनांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीरित्या चित्रण केले. मलाही हिंदी चित्रपटसृष्टीने अगदी आपलेसे करुन घेतले. तुम्ही आजवर केलेल्या प्रेमामुळेच मी इथवर पोहोचलो. या प्रवासासाठी ‘फॅंटम फिल्म्स’, ‘बालाजी फिल्म्स’, ‘क्लिनस्लेट फिल्म्स’ आणि ‘फॉक्सस्टार मुव्हिज’चे मी आभार मानतो.’ असे म्हणत या पोस्टमधून दिलजितने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत प्रत्यक्ष आणि आप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. चाहत्यांसाठी ही अशी भावनिक पोस्ट प्रसिद्ध करत त्याने झालेल्या चुकांबद्दल माफीही मागितली.

दिलजितच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही अनेकांनीच त्याची प्रशंसा केली. बॉलिवूडमध्ये एकीकडे जिथे घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन कलाकारांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहेत तिथेच या पंजाबी अभिनेत्याला बी-टाऊनने आपलेसे करुन घेतले, असे म्हणायला हरकत नाही. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही बी-टाऊनमधील घराणेशाहीच्या संकल्पनेना शह देत स्वत:ची अशी वेगळी ओळख आणि चाहतावर्ग निर्माण केला. दरम्यान, ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणाऱ्या पंजाबी गायक-अभिनेता दिलजित दोसांज याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण) हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.