चित्रपट :  फिलौरी

साहिबा आणि मिर्झाची दास्ताँ-ए-इश्क कधी गाण्यातून, कधी कवितांतून सांगत त्यात रंगून जाणारा पंजाब प्रांत. स्वातंत्र्यपूर्वकाळातील पंजाबची आबोहवा, तिथले लोकगीत-लोकसंगीत यांचा पुरेपूर वापर करत एक  कवयित्री आणि गायक यांच्या प्रेमाची कथा रंगवणारा ‘फिलौरी’ हा चित्रपट खचितच वेगळा आहे. अंशल लाल दिग्दर्शित आणि अनुष्का शर्माची निर्मिती असलेला ‘फिलौरी’ ही संगीतमय प्रेमकथा आहे. दोन काळांतील प्रेमाला जोडून घेणाऱ्या क थेत दिलजीत-अनुष्काची स्वातंत्र्यपूर्वकाळातील प्रेमकथा संपूर्ण चित्रपटावर भारी पडली असल्याने चित्रपटाचे मूळ कथाबीज काय याबद्दल गोंधळ उडतो. पण संगीत, १९३१ च्या काळातील पंजाब प्रांताचे देखणे चित्रण आणि फ्लॅशबॅक-वर्तमानाचा खेळ रंगवत केलेली मांडणी यामुळे ‘फिलौरी’ हा एक सुंदर अनुभव ठरला आहे.

कॅ नडातून शिकून नुकताच भारतात परतण्याच्या तयारीत असलेल्या काननच्या (सूरज शर्मा) मागे त्याच्या घरच्यांनी लग्नाचा लकडा लावला आहे. त्याची बालमैत्रीण अन्नू (मेहरीन पिरजादा) याच लग्नघटिकेच्या प्रतीक्षेत एकेक दिवस मोजत त्याच्या परतण्याची वाट पाहते आहे. अन्नू आणि घरच्यांची लग्नाची घाई काननला आतून अस्वस्थ करते, लग्नासाठी तो मायदेशात परततो पण तो मनापासून लग्नाला तयार नाही. त्यातच त्याच्या पत्रिकेत मंगळ असल्याने त्याला पिंपळाच्या झाडाशी विवाह करायला लागतो. आणि अन्नूशी लग्न होण्याआधीच शशीचे (अनुष्का शर्मा) भूत त्याच्या आयुष्यात शिरकाव करते. एकीकडे आपल्याशी लग्न केल्याचा शशीचा दावा आणि दुसरीकडे अन्नूचा लग्नासाठी ससेमिरा यात अडकलेल्या काननला पाहता पाहता शशीचा भूतकाळ उलगडत जातो.

अतिशय कडक शिस्तीचा, शिक्षण घेऊन आपल्या बहिणीने चांगल्याच मार्गावर वाटचाल करावी म्हणून धाकात ठेवणाऱ्या भावाबरोबर अतिशय साधेपणाने राहणारी शशी मुळात हुशार आहे. फिलौरच्या त्या हवेत कोणा एका फिलौरीच्या कविता खूप प्रसिद्ध आहेत. स्वत:ला फि लौरी म्हणवणारा आणि देखण्या तरुणींची आपल्या गाण्यातून मने जिंकणाऱ्या गायकाची (दिलजीत दोसैन) गाठ शशीशी पडते. शशीच्या प्रेमामुळे फिलौरीला जगण्याचा उद्देश मिळतो. ज्या काळात चूल आणि मूल यापलीकडे स्त्रीचे विश्व पोहोचले नव्हते तिथे शशीसारख्या हुशार तरुणीला तिचा सन्मान मिळवून देण्याचा निर्धार फिलौरी करतो. या दोघांच्या प्रेमाची कथा सुफळ संपूर्ण होत नाही. शशी मात्र भूत बनून शंभर र्वष तशीच जगते आहे. शशी आणि फिलौरीच्या प्रेमातून काननच्या मनातला प्रेमाचा गोंधळ दूर होतो का? याचीही समांतर कथा चित्रपटात आहे.

‘फिलौरी’ नावाने आलेल्या चित्रपटाची कथा २०१७ मध्ये सुरू होत असली, तरी त्या कथेचा गाभा हा १९३१ च्या काळातलाच आहे. त्यामुळे त्या काळातील पंजाब, तिथल्या व्यक्तिरेखा रंगवणे हे दिग्दर्शकासमोरचे आव्हान होते. ते अंशल लाल यांनी लीलया पेलले आहे. शशी आणि तिचा भाऊ वीर यांच्यातील नाते, शशी आणि फि लौरीचे फु लत गेलेले नाते हा सगळा कथाभाग देखणा झाला आहेच. त्याचबरोबर एक कवयित्री आणि गायक यांच्यात ती प्रेमकथा फुलत असल्याने त्याला साजेसे संगीतही चित्रपटाला मिळाले असल्याने एक संगीतमय प्रेमकथा म्हणून दिलजीत-अनुष्काच्या प्रेमाचा भाग रसिकांवर गारूड करतो. त्या तुलनेत, शशीचे काननच्या आयुष्यात आल्यानंतर त्या दोघांमध्ये नकळत तयार झालेले नाते मात्र दिग्दर्शकाने तितके प्रभावीपणे रंगवलेले नाही. कानन आणि अन्नूची कथाही तुकडय़ातुकडय़ात येत असल्याने तिचा फारसा प्रभावही पडत नाही किंवा चित्रपटातील या भागाचे खास प्रयोजनही कळत नाही. त्यामुळे चित्रपट थोडासा रेंगाळल्यासारखा वाटतो. दिलजीत दोसैन आणि अनुष्का शर्मा या दोघांचीही जोडी पडद्यावर खूप छान दिसते. दोघांनीही आपल्या व्यक्तिरेखा जिवंत के ल्या आहेत. त्यातही दिलजीत उजवा ठरतो कारण त्याला वेगळा लूक देण्यात आला आहे. त्याचा लूक आणि सहजाभिनय यामुळे त्याची फिलौरीची व्यक्तिरेखा जास्त उठून दिसते. सूरज शर्माने काननच्या भूमिकेसाठी वेगळी उच्चारांची ढब, देहबोली आत्मसात केली आहे. जेणेकरून गोंधळलेला कानन सहजी जाणवतो. मात्र त्याच्या व्यक्तिरेखेला आणि अन्नूच्या व्यक्तिरेखेलाही क थेतच मर्यादा आल्या आहेत. चित्रपटाचे संगीत वेगळे आहे आणि प्रेमकथेला साजेसे असे आहे. याशिवाय, व्हीएफएक्सचा वापरही चित्रपटात प्रभावीपणे करण्यात आला असल्याने एक संगीतमय प्रेमकथा म्हणून हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत राहतो.

  • निर्मिती – अनुष्का शर्मा, फॉक्स स्टार स्टुडिओज
  • दिग्दर्शन – अंशल लाल
  • कलाकार – अनुष्का शर्मा, दिलजीत दोसैन, सूरज शर्मा, मेहरीन पिरजादा, रझा मुराद.