अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘फिल्लौरी’ या सिनेमाची सध्या बॉलिवूड वर्तुळात चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षक आणि समीक्षकांनी अनुष्काच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलरला चांगलीच पसंती दिली. ट्रेलरमागोमाग सध्या या सिनेमाचे पोस्टरही चर्चेत आहेत. अनुष्का आणि दिलजितच्या लूकपासून ते अगदी या सिनेमाच्या हटके कथानकाविषयी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली असताना सिनेमातील अजून एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘साहिबा’ असे बोल असलेले हे गाणे आणि त्यातील शब्द अनेकांच्या मनात घर करत आहेत.

या सिनेमातली सगळीच गाणी प्रेक्षकांना पसंत पडत आहेत. साहेबा हे गाणे दिलजीतनेच गायले असावे असा अंदाज सर्वजण बांधत असताना, हे गाणे रुमी या गायकाने गायले आहे. गाण्यात जुना काळ दाखवताना त्यात प्रेमही तेवढेच दाखवण्यात आले आहे. हे गाणे दिलजीतने गायला हवे असे त्याच्या चाहत्यांना वाटत होते. पण तसे झालेले दिसत नाही.

या गाण्याला शाश्वत सचदेवने संगीत दिले असून अनवित्ता दत्तने हे गाणे लिहिले आहे. एकमेकांवर नित्सिम प्रेम करणारी प्रेमीयुगुलं जेव्हा वेगळी होतात तेव्हा त्यांच्यासोबत काय होते ते या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. अनुष्का आणि दिलजीतवर चित्रित झालेले हे गाणे प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल. हे गाणे प्रदर्शित होण्याआधीपासूनच दिलजीत आणि अनुष्काने या गाण्याबद्दल उत्सुकता वाढवली होती. ट्विटर चॅटवर दोघांनीही या गाण्याचे काही बोल ट्विट केले होते. या गाण्याआधी फिल्लौरीची व्हॉट्सअॅप आणि दम दम ही दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘फिल्लौरी’ या सिनेमाद्वारे अनुष्का शर्मा आणि दिलजित दोसांज ही एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘उडता पंजाब’ या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता दिलजित दोसांज आता बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावत आहे. त्यामुळे अनुष्का आणि दिलजितची एका वेगळया काळातील ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. २४ मार्चला अनुष्का आणि दिलजितचा हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.