मित्रमंडळींच्या किंवा आपल्या घरातील कार्यक्रमामध्ये कोणाच्या हातात कॅमेरा दिसला की ‘मेरा फोटो खिचों ना’ असं एकदा तरी म्हटलं जातं. त्यातही अनेकांच्या ओळखीचा एक असा कॅमेरामन असतो ज्याच्या गळ्यात नेहमी डीएसएलआर आणि ज्याच्या मागे नेहमी फोटो काढून घेण्यासाठी अनेकांनी तगादा लावलेला असतो. ‘ए फोटो खिच, फोटो खिच’ असं आपणही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. हाच शब्द आणि त्याचं महत्त्व लक्षात घेत गौरव संजय प्रभू या व्लॉगरने एका नव्या कॅम्पेनची सुरुवात केली आहे.

फोटोग्राफी हा विषय शिकवणारा गौरव एक फिल्ममेकर आहे, त्यासोबतच यूटय़ूब व्लॉगिंगमध्येही तो बराच सक्रिय आहे. विविध ठिकाणांना भेट देऊन त्याचे व्लॉग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतानाच कुतूहल म्हणून या चौकटीबाहेरच्या वाटाडय़ाने ही गोष्ट मनावर घेतली आणि शुभस्य शीघ्रम असं म्हणत एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली. ‘फोटो खिचो’ या नावाने गौरवने फोटोग्राफी शिकवण्याचा उपक्रम सुरू केला. आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी लोक फिरण्यासाठी जातात. पण तिथे काही अशीही ठिकाणं असतात जी स्थानिकांमध्ये बरीच प्रसिद्ध असतात, पण पर्यटक मात्र त्या ठिकाणांकडे अनेकदा पाठ फिरवतात. अशाच ठिकाणांच्या शोधात असताना आणि सोशल मीडियावर फेरफटका मारत असतानाच गौरवची नजर काही फोटोंवर पडली, ते फोटो होते मध्य प्रदेश येथील जनवार गावातील लहान मुलांचे.

त्या फोटोंमध्ये नावीन्य होतं, कारण त्यात अगदी कोणाच्या नजरेसही न पडणाऱ्या गावातील मुलं स्केटबोर्डवर स्केटिंग करताना दिसत होती, त्याचा आनंद घेत होती. हे काहीतरी वेगळं आहे, याची जाणीव झाल्यानंतर या खुरापती व्लॉगरने आपली सूत्रं हलवली आणि काही माहिती मिळवल्यानंतर अवघ्या एका मेलमध्येच जनवारमध्ये जाऊ न त्या मुलांना फोटोग्राफीचे धडे देण्याचा निर्णय घेतला. फोटोग्राफीसारखी कला खरं तर बरंच काही देऊन जाते, फक्त त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असं म्हणणारा गौरव काही महिन्यांपूर्वी जनवारला जाऊन आला. यामध्ये त्याला मदत झाली ती म्हणजे ‘जनवार कॅसल’ या एनजीओची. आपली बाइक, व्लॉगिंगचा कॅमेरा आणि बराच उत्साह हे सारं पाठीशी बांधून गौरवने थेट जनवारची वाट धरली. बरेच दिवस त्या गावामध्येच राहून त्याने तिथल्या मुलांना फोटोग्राफीतील काही महत्त्वाचे घटक आणि बेसिक गोष्टी सांगून ही अनोखी कला शिकवली. या कलेमध्ये मुलं रुळतायेत हे पाहून त्याने एक डिजिटल कॅमेराही देऊ  केला. सध्या दर आठवडय़ाला हा कॅमेरा प्रत्येक मुलाला हाताळण्याची संधी मिळते. जनवारवरून परतल्यानंतर काही दिवसांनी त्या मुलांनी काढलेले फोटो जनवार कॅसल या एनजीओतर्फे गौरवपर्यंत पोहोचले आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. याविषयीच सांगताना गौरव म्हणाला, ‘मी त्या मुलांना फोटोग्राफी शिकवली, त्या वेळी मोठय़ा कुतूहलाने त्यांनी ही कला जाणून घेतली. तिथे माझ्या साथीने अवनीत होता. जो त्या गावातील मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी आला होता. एका अतिसामान्य गावात स्केरटबोर्ड पार्क असणं ही जितकी नवी बाब होती तितकंच माझं व्लॉगिंगही त्या मुलांसाठी नवीन होतं. पण शहरांमध्ये ज्याप्रमाणे कॅमेऱ्यासमोर आपण बोलू लागल्यावर लोक हसतात तसा अनुभव मला तिथे आला नाही. त्या मुलांना प्रत्येक गोष्टीबद्दल कमालीचं कुतूहल होतं. माझ्या या उपक्रमाची मी काही फार वाच्यता केली नव्हती, पण व्लॉग्सच्या माध्यमातून मी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत होतो. त्यातूनच अधिकाधिक लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आणि मला शुभेच्छा देणारे, पाठिंबा देणारे मेसेजेस येऊ  लागले. माझ्या कामाची पोचपावती मला तेव्हा मिळाली जेव्हा त्या मुलांनी स्वत: काही गोष्टींचा नव्याने शोध लावला. जनवारसारख्या गावात त्या मुलांनी वेडिंग फोटोग्राफीसुद्धा केली. हे खरंच भारावून टाकणारं होतं.’

जनवार कॅसल आणि गौरव प्रभूचं ‘फोटो खिचो’ यांना मिळालेल्या या यशानंतर आता त्याने हिमाचल प्रदेश, दक्षिण भारत, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या भागांमधील काही गावांमध्ये जाऊन ‘फोटो खिचो’अंतर्गत फोटोग्राफी शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. किंबहुना लवकरच तो हिमाचल प्रदेशातील चंबा येथील काही दुर्गम गावांमध्ये जाऊन फोटोग्राफीचे धडे देणार आहे. सुरुवातीला स्वत:च्या खर्चाने जनवारला गेलेल्या या अवलियाला आता इतर यूटय़ूबर्ससुद्धा पाठिंबा देत आहेत. प्रसिद्ध व्लॉगर प्रसाद वेदपाठकनेही त्याच्या ‘यूआयसी’ चॅनलवरून गौरवचं हे कॅम्पेन सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही जणांनी ‘केटो’ या वेबसाइटद्वारे त्याला आर्थिक मदत देऊ  केलीये. काहींनी तर या उपक्रमासाठी त्याला डिजिटल कॅमेरेसुद्धा देणगी स्वरूपात दिले आहेत. त्यामुळे आपल्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत अशा हटके उपक्रमांसाठी नव्या जोमाच्या मंडळींना मिळणारा मदतीचा हातसुद्धा प्रशंसनीय बाब ठरत आहे.

एका शिक्षकाच्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टींकडे पाहणारा आणि या गोष्टी अनुभवणारा गौरव म्हणाला, ‘हल्ली शिक्षकांचा शिकवण्याचाही दृष्टिकोन बदलत आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांसमोर हटके गोष्टी सादर कराव्यात आणि त्यांना उपलब्ध संधींची जाणीव करून द्यायची असाच आमचा अट्टहास आहे.’ अर्थात हे असे उपक्रम राबवताना त्यात काही अडचणीसुद्धा येतात. कारण, ज्या वेळी अशा उपक्रमांसाठी लोक पैसे देतात तेव्हा ते योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत की नाही, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. त्यांना पडणारे हे प्रश्न साहजिकच आहेत. त्यामुळे अशा गोष्टींचीही गौरव पूर्ण काळजी घेतो.

यूटय़ूबवर नेहमीच विविध व्हिडीओ, गाणी आणि सोनूसारखे व्हिडीओ ट्रेंडमध्ये येतात. पण मनोरंजनाच्या या नव्या दुनियेमध्ये गौरव त्याची नवी ओळख बनवू पाहतोय. त्याच्या या व्लॉगिंगचा स्तर उंचावू पाहतोय आणि सोबतच देशाच्या कानाकोपऱ्यातील बऱ्याच मुलांच्या स्वप्नांना नवी लकाकी देऊ  पाहतोय. तर मग तुम्ही वाट कसली पाहताय, सगळं सेट आहे, लाइट्स.. कॅमेरा.. ‘फोटो खिचो’.