कपिल शर्मा मागचे दुष्टचक्र काही संपण्याचे नावच घेत नाही. सुनील ग्रोवर प्रकरणातून आता कुठे तो बाहेर येत असताना कपिल अजून एका संकटात सापडण्याची शक्यता आहे. स्टॅण्डअप कॉमेडियन अभिजीत गांगुलीने कपिलवर त्याचे विनोद चोरल्याचा आरोप केला आहे.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिलचे विनोद सर्वांनाच पोट धरून हसायला भाग पाडतात. यासाठी नेहमीच कपिलचे कौतुक केले जाते. फक्त कपिलचेच नाही तर शोच्या लेखकांचेही अनेक वेळा कौतुक केले जाते. पण आता स्टॅण्डअप कॉमेडियन अभिजीत गांगुलीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर कपिल शर्मा शोचा एक व्हिडिओ शेअर करून या शोमध्ये त्याचे विनोद चोरल्याचा दावा केला आहे.

हा प्रसंग किकू शारदावर चित्रीत करण्यात आला होता. अभिजीतने त्याच्या पोस्टमध्ये हेही सांगितले की, त्याने भारतीय गोलंदाजांवर एक खास विनोद तयार केला होता. तो हा विनोद त्याच्या शोमध्ये अनेकदा वापरतो. पण अचानक रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये तो जोक वापरल्यानंतर अनेकांचे त्याला मेसेज आले. त्यांच्याकडून अभिजीतचा हा जोक शोमध्ये वापरला गेला असल्याची माहिती त्याला मिळाली.

यासंदर्भात कपिलशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. नुकताच कपिलने त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या १०० व्या भागाचे सेलिब्रेशन केले. यावेळी कपिलने सर्व चाहत्यांचे आणि सह-कलाकारांचे आभार मानले. सह- कलाकारांमुळे हा शो वर्षभरात इतका यशस्वी होऊ शकला अशी प्रांजळ कबुली त्याने शोदरम्यान दिली होती.