चित्रपटसृष्टीमध्ये सौंदर्य आणि अभिनयाची देणगी लाभलेली एक अभिनेत्री म्हणजे रेखा. अनेक चित्रपटांद्वारे विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे रेखा यांनी चाहत्यांच्या मनावर अक्षरश: राज्य केले.  सध्या रेखा चित्रपट आणि अभिनय क्षेत्रामध्ये सक्रिय नसल्या तरीही विविध कार्यक्रमांना त्या आवर्जून हजेरी लावतात. बॉलिवूडमध्ये आयोजित विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये तर अनेकांच्याच नजरा रेखा यांच्यावर खिळलेल्या असतात. प्रेक्षकांना आपल्या एकाच नजरेने घायाळ करणाऱ्या रेखा लवकरच एका चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. एका तमिळ चित्रपटाद्वारे चित्रपट जगतात पदार्पण करणाऱ्या रेखा यांनी पुन्हा त्यांचा मोर्चा तमिळ चित्रपटांकडे वळवला आहे.

दिग्दर्शक सूर्याच्या आगामी चित्रपटाद्वारे रेखा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रहस्यमय थरारपट असणाऱ्या या चित्रपटामध्ये लक्ष देण्यासारखी बाब अशी की, ४३ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्री पूर्णा जगन्नाथन या चित्रपटामध्ये वयाने मोठ्या असणाऱ्या रेखाच्या आईची भूमिका साकारणार आहे. पूर्णा जगन्नाथन यांनी या चित्रपटातील त्यांच्या दृश्यांच्या चित्रीकरणाला सुरुवातही केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जानेवारी महिन्यामध्ये पूर्णा रेखा यांच्यासोबत उर्वरित चित्रीकरण पूर्ण करतील.

या चित्रपटातील भूमिकेसाठी पूर्णा खूपच उत्साहित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘मी लहानपणापासूनच रेखा मॅमची चाहती आहे. त्यांच्यासोबत एकाच चित्रपटात काम करणं हे माझ्यासाठी एक स्वप्नच आहे’, असे पूर्णा म्हणाल्या. या चित्रपटामध्ये तीन पिढ्यांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे, असे सांगत ‘मी रेखा यांच्यासोबत पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये चित्रीकरण करेन’, असेही त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाशी संबंधित फार काही माहिती सांगण्यात आली नाही. पण, तरीही रेखा यांना नव्या रुपात पाहण्यासाठी त्यांच्या प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान अभिनेत्री रेखा यांनी काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ‘स्टार स्क्रिन पुरस्कार’सोहळ्यामध्ये अवघ्या काही क्षणांसाठी नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले होते. रेखा यांना या पुरस्कार सोहळ्यामध्ये चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिनेत्री सोनम कपूरने यावेळी रेखा यांना मानवंदना देत त्यांना व्यासपीठावर बोलवले. यावेळी रेखा यांनी एक सुरेखशी साडी परिधान केली होती. ‘स्टार स्क्रिन पुरस्कारां’च्या या दिमाखदार सोहळ्याचे लवकरच प्रक्षेपण करण्यात येणार आहे.