फार नाही तीन वर्षांपूर्वी कपिल शर्मा नामक टेलीव्हिजनवर येणाऱ्या एका विनोदी अभिनेत्याने ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा शो सुरू केला. त्याची विनोदाची जाण, शोसाठी बांधलेली टीम या सगळ्याची प्रेक्षकांवर इतकी मोहिनी पडली की कपिल शर्मा हे नाव जगभरात पोहोचले. दरवर्षी ‘फोर्ब्स’ला आपल्या यादीत कपिल शर्माचे नाव घ्यावेच लागते. गेल्यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या शंभरजणांच्या यादीत ‘फोर्ब्स’ने कपिलला अकरावे स्थान दिले आहे. तर त्याला मिळणाऱ्या लोकप्रियतेसाठी तो सातव्या स्थानावर आहे. इतकेच नाही तर आपल्याकडेही सर्वाधिक आगाऊ कर रक्कम भरणाऱ्या कलाकारांच्या यादीतही कपिल चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या त्याचा शो वादात सापडला असला तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. एक दिवस अचानक असं काही सापडून जावं आणि आयुष्यभर त्या शोचं, मालिकेचं बोट धरून पुढे जात राहणारे असे काही कलावंत टेलीव्हिजनने दिले आहेत. मात्र त्यातील फार कमीजणांना त्या शोच्या प्रतिमेतून बाहेर पडणे शक्य होते. कित्येकदा तो शोच त्यांची ओळख बनून राहतो.

एखादाच शो आणि त्याच्याशी जोडला गेलेला कलाकार म्हणून जेव्हा चर्चा होते तेव्हा हटकून पहिल्यांदा आठवण येते ती अभिनेत्री तबस्सूम यांची.. तबस्सूम यांनी हिंदी चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून काम के ले होते. काही चित्रपटांमधूनही त्यांनी छोटय़ा-मोठया भूमिकाही केल्या. मात्र त्यांचं नाव कायम जोडलं गेलं ते ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाशी.. चित्रपट कलाकारांना आपल्या या शोमधून बोलतं करणाऱ्या हसऱ्या चेहऱ्याच्या, बडबडय़ा तबस्सूमच आजही लोकांच्या आठवणी आहेत. तबस्सूम म्हणजेच ‘फुल खिलें है गुलशन गुलशन’ हे समीकरण कधीच तुटलं नाही. तिची हसरी बडबड हीच या शोची खरी गंमत होती, लोकांनाही तेच आवडत होतं आणि त्यामुळे तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्यासह हा शो लोकांच्या आजही स्मरणात आहे. तिच्या शोमध्ये कोण-कोण कलाकार येऊन गेले, ते काय बोलले हे कोणालाही आठवणार नाही, असं चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सांगतात. टेलीव्हिजनवर वाहिन्यांचा दौर सुरू झाला त्यावेळी ‘अंताक्षरी’च्या माध्यमातून आणखी एक नाव घराघरात पोहोचलं होतं ते म्हणजे अभिनेता अन्नु कपूर. खरं म्हणजे अन्नु कपूर यांची चित्रपटातील कारकिर्द खूप मोठी आहे. अनेक चित्रपटांमधून त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘अंताक्षरी’चा सूत्रसंचालक म्हणून त्यांना जी लोकप्रियता मिळाली ती आजही त्यांच्याबरोबर कायम आहे. गाण्यांचा दर्दी अशी त्यांची प्रतिमा या शोमुळे लोकांसमोर आली आणि ती त्यांना आजही उपयोगी पडते आहे. आत्ताही अन्नु कपूर एका वाहिनीसाठी गाण्यांचा खास शो करतात. अर्थात त्याला ‘अंताक्षरी’ची तोड नाही. दुरदर्शनवरच्याच ‘सुरभि’ मालिकेतून सिध्दार्थ काक आणि अभिनेत्री रेणूका शहाणे ही जोडी लोकप्रिय ठरली. रेणूका शहाणे यांचं नाव घेतल्यानंतर ‘हम आपके है कौन’ची भाभी आठवते मात्र त्याहीआधी त्यांना ‘सुरभि’मध्ये ज्यांनी पाहिलं आहे त्या पिढीला त्या रेणूकाची आठवण प्रकर्षांने होते.

अर्थात, त्याकाळी एखाद्या कलाकाराचा एखादाच शो गाजला. तरी त्यातून त्यांना बाहेर पडणं शक्य होतं. त्या शोचं आयुष्य त्यावेळी फार कमी असायचं. त्यामुळे नुसत्या एका शोवर अवलंबून न राहता सातत्याने काहीतरी वेगवेगळे पर्याय धुंडाळणं गरजेचंही होतं आणि शक्यही होतं. आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे. आदेश बांदेकर आणि ‘भावोजी’ हे समीकरण गेली बारा वर्ष कायम टिकून आहे. आजही आदेश बांदेकरांचा ‘होम मिनिस्टर’ हा शो तितक्याच आवडीने पाहिला जातो. तितकाच लोकप्रिय आहे. आता तर आदेश बांदेकर हे महाराष्ट्रातील तमाम वहिनी वर्गाचे भावोजी म्हणून ओळखले जातात. याच शोच्या जोरावर बांदेकर निर्माते म्हणून नव्या भूमिके त शिरले. त्यांच्या निर्मितीसंस्थांच्या मालिका सध्या मराठी वाहिन्यांवर घर करून आहेत. मात्र एक अभिनेता म्हणून आदेश बांदेकर दुसऱ्या कुठल्याच चित्रपटातून, मालिकेतून दिसले नाहीत. आत्ताच्या काळात या ‘एक्स’ फॅक्टरमुळे चमकणारे आणि पुढे त्याचाच व्यवसाय म्हणून स्वीकारत नावारूपाला येणारे कलाकार आपल्याला दिसतात. पण त्या शोच्या प्रतिमेतून बाहेर पडणं हे या कलाकारांसाठी येत्या काळात आव्हान ठरणार आहे, असं मत ठाकूर यांनी व्यक्त केलं. ‘होम मिनिस्टर’ हा शो गेली बारा वर्ष अव्याहत सुरू आहे. पण हे भाग्य प्रत्येक शोला मिळेलच असे नाही. सध्या कपिल शर्माचेच उदाहरण यासाठी आदर्श म्हणावे लागेल. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा शो सुरूवातीला ‘कलर्स’वर होता. तीन वर्ष टीआरपीच्या शर्यतीत नंबर वन राहूनही वाहिनीशी वाद झाल्यानंतर कपिलला हा शो सोडावा लागला. दरम्यानच्या काळात या शोच्या माध्यमातून निर्माता म्हणूनही जम बसवलेल्या कपिलने लगोलग ‘सोनी एंटरटेन्मेट टेलीव्हिजन’ वाहिनीशी क रार करत ‘द कपिल  शर्मा शो’ या नविन नावाने पुन्हा आपला शो सुरू केला. मात्र आता अंतर्गत वादामुळे पुन्हा त्याच्यावर संकट ओढवले आहे. या एकाच शोमुळे सर्वाधिक कमाई करत कपिल बॉलीवुडमधील आघाडीच्या फळीतील कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. अशी न भूतो न भविष्यति प्रसिध्दी मराठीत सध्या डॉ. निलेश साबळेच्या रूपाने  अनुभवायला मिळते आहे. डॉ. निलेश साबळेच्या संकल्पनेतून उतरलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा ‘झी मराठी’ वाहिनीवरचा शो सध्या लोकप्रियतेचे नवनवे मापदंड ओलांडतो आहे. निलेशचे सूत्रसंचलन हा जेवढा या कार्यक्रमाचा जीव आहे तेवढाच हा शो भारत गणेशपुरे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि टीमच्या अभिनयाची कमाल आहे. वेगवेगळ्या संकल्पना वापरत निलेशने हा शो रंगवत ठेवला आहे. पण या शोपलिकडे जात निलेश साबळे काय करणार, यावर तो ही त्याची प्रतिमा भेदू शकेल की नाही हे ठरेल. खरं म्हणजे आत्ताच्या काळात या अशा शोचं आयुष्य वाढलं आहे हे खरं आहे. अनेक नवे पर्यायही आत्ताच्या कलाकारांसमोर उभे राहिले आहेत तरीही लोकांमध्ये ठसलेली प्रतिमा भेदणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान ते कसं पेलतात, यातून त्यांची पुढची दिशा ठरेल, असं ठाकूर सांगतात. याचं उत्तम उदाहरण दिलीप प्रभावळकर आहेत, असं त्यांनी सांगितलं. दूरदर्शनच्या काळात प्रभावळकरांनी ‘चिमणराव’ केला आणि आजही त्यांची ती प्रतिमा लोकांच्या मनात घर करून आहे. पण एक अभिनेता म्हणून प्रभावळकरांची अभ्यासू वृत्ती, सतत नवे करण्याचा प्रयत्न यामुळे त्यांची प्रत्येक भूमिका, चित्रपट लोकांना आवडत राहिले. ते चिमणरावाच्या प्रतिमेत अडकून पडले नाहीत. आत्ताही कपिल शर्माप्रमाणेच कॉमेडी शोमधून वर आलेली भारती सिंग सारखी अभिनेत्री वेगवेगळ्या विनोदी शोजमधून अगदी आत्ता तर ‘नच बलिए’ सारख्या नृत्याच्या शोमधूनही स्वत:चा वेगळा ठसा मांडण्याचा प्रयत्न करते आहे. सध्या ‘नच बलिए’साठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून भारती सिंगने या नव्या पर्वात आपला दबदबा निर्माण केला आहे. अंगी असलेल्या गुणाच्या बळावर एखादा शो गाजवणाऱ्या या कलाकारांसमोरचे आवाहन बदलत्या काळानुसार अधिक कडवे होत चालले आहे हे यानिमित्ताने समोर आले आहे.