‘बाहुबली’ सिनेमानंतर प्रभासचा भाव भलताच वाढला. त्याला आपल्या सिनेमात घेण्यासाठी प्रत्येक निर्माता शर्थीचे प्रयत्न करत होता. पण ‘साहो’ सिनेमाच्या निर्मात्यालाच यात यश आले असे म्हणावे लागेल. ‘बाहुबली’ सिनेमानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या प्रभासच्या आगामी ‘साहो’ या सिनेमाचीही चर्चा जोरदार रंगली आहे. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान काय होते याची बित्तमबातमी जाणून घेण्यास त्याचे चाहते कमालीचे उत्सुक असतात.

‘फोर्ब्स’च्या यादीत आमिर ठरला ‘गरीब’

जेव्हापासून प्रभास या सिनेमात काम करणार हे निश्चित झाले होते तेव्हा त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री काम करणार याची चर्चा रंगली होती. दरदिवशी अभिनेत्रीशी निगडीत नवनवीन बातम्या येत होत्या. कतरिना कैफ, अनुष्का शेट्टी, सोनम कपूर अशा अनेक अभिनेत्रींशी यासंबंधी चर्चाही केल्या पण अखेरीस श्रद्धा कपूरच्या नावावर या सिनेमातील मुख्य अभिनेत्री म्हणून शिक्कामोर्तब केले गेले.

या सिनेमात अभिनेत्री कोण असणार या शंकेचं निरसन झाल्यावर आता या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत कोण दिसणार, हा नवा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हा एक अॅक्शनपॅक सिनेमा असल्यामुळे खलनायकाची भूमिकासुद्धा तेवढीच तगडी असणार यात काही शंका नाही.
या सिनेमात अभिनेते जॅकी श्रॉफ खलनायकाची भूमिका साकारणार असे आधीच कळले होते. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात एक दोन नाही तर तब्बल तीन खलनायक असणार आहेत. जॅकी श्रॉफ यांच्याव्यतिरिक्त अभिनेता नील नितीन मुकेश आणि चंकी पांडे हे दोघेही ‘साहो’मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.

आता हे बॉलिवूड सिनेमातील हिरो ‘साहो’मध्ये प्रभाससमोर खलनायक होऊन त्याला किती त्रास देतात की एकटा प्रभासच या तिघांवर भारी पडतो हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेलच.